रेडिमेड नऊवारी!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 20 August 2019

तरुणींची रेडिमेड नऊवारीमध्ये व्हेरिएशनची मागणी वाढत आहे. साध्या नऊवारीपासून सुरू झालेला ट्रेंड थेट आता शाही मस्तानी नऊवारी साडीपर्यंत पोहोचला आहे. आता तरुणींमध्ये शाही मस्तानी नऊवारी साडीची क्रेझ जास्त दिसत आहे. 

श्रा  वण सुरू झाला म्हणजे आता श्रावणातील सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतील. मंगळागौरीचा खेळही रंगेल. ‘माझ्या मैत्रिणीची मंगळागौर आहे... तर नऊवारीच नेसून जायची आहे...’ असे संवाद आता घरोघरी ऐकण्यास मिळतात. पूर्वीप्रमाणे नऊवारी नेसण्याचा कल कमी झाला आणि रेडिमेड नऊवारी विकत घेण्याकडे कल वाढत आहे. तरुणींची रेडिमेड नऊवारीमध्ये व्हेरिएशनची मागणी वाढत आहे. साध्या नऊवारीपासून सुरू झालेला ट्रेंड थेट आता शाही मस्तानी नऊवारी साडीपर्यंत पोहोचला आहे. आता तरुणींमध्ये शाही मस्तानी नऊवारी साडीची क्रेझ जास्त दिसत आहे. 

श्रावण महिना ते दिवाळी यादरम्यान नऊवारी साडीच्या खरेदीला उधाण येते. नऊवारीमध्ये प्लेन नऊवारी, ब्राह्मणी, पेशवाई, शाही मस्तानी असे प्रकार बाजारात पाहण्यास मिळतात. यामध्ये शाही मस्तानी ट्रेंडला तरुणींकडून प्रचंड पसंती मिळत आहे. दादरमधील ‘साडीघर’ रेडिमेड नऊवारी साडीसाठी प्रसिद्ध आहे. दादरमध्ये अन्य दुकानात; तसेच गिरगावातील दुकानात नऊवारी साडी शिवून मिळते. पॉलिकॉट सिल्क, टंचोई सिल्क, कॉटन सिल्क मिक्‍स, ताना सिल्क, प्युअर सिल्क, आर्ट सिल्क, मैसूर सिल्क या कपड्यामंध्ये रेडिमेड नऊवारी साडी शिवून मिळते. यामध्ये कॉटन सिल्क वजनाने हलकी आणि अंगाला अगदी परफेक्‍ट बसते. त्यामुळे ग्राहक या मटेरियलला जास्त पसंती देतात. लग्नसराईसाठी  प्युअर सिल्कच्या साड्यांना मागणी असते. प्युअर साडीचे कलर काँबिनेशन ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे मिळू शकते. 

नऊवारीमध्ये पहिले ब्राह्मणी साडीचा ट्रेंड होता. त्यानंतर पेशवाईचा आला आणि आता शाही मस्तानीचा ट्रेंड आला आहे. पेशवाई नऊवारीमध्ये पुढील ओचाची किनार झिकझॅक आकाराची असते; तर शाही मस्तानीमध्ये ओचाला जास्त निऱ्या असून त्याही झिकझॅक आकारात असतात. पण ४५-५० वयोगटातील महिला आताही ब्राह्मणी नऊवारी साडी विकत घेतात. या वर्षी आणखी एक प्रकार आम्ही तरुणींसाठी घेऊन आलो, तो म्हणजे मयूरपंख नऊवारी. यामध्ये नऊवारीच्या ओचाची किनार मयूरपंखांच्या आकारात डिझाईन केली आहे, असे गौतम यांनी सांगितले. 

रेडिमेड नऊवारी साडी अस्तरसहित शिवून दिली जाते. या साडीमध्ये गडद रंगांची रंगसंगती जास्त उठून दिसते. लाल-हिरवा,  निळा-हिरवा, नारंगी, निळा-आकाशी, हिरवा-गुलाबी, गुलाबी-जांभळा, राणी-निळा या प्रकारचे कॉन्ट्रास रंग जास्त खुलून दिसतात. या साडीवर मॅचिंग शेले मिळतात. रेडिमेड नऊवारी साडीवर कॉन्ट्रास रंगाचे ब्लाऊज शिवून घेण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये नऊवारी साडीच्या काठाचा वापर करून आकर्षक डिझाईन ब्लाऊज शिवून मिळतात. वेगवेगळ्या छोट्या बुट्टीचे डिझाईनचे ब्लाऊज पीस नऊवारीला उठून दिसतात. कॉन्ट्रास ब्लाऊजच्या हाताला विविध डिझाईन टेलरकडून करून मिळते. अशा डिझाईनची ब्लाऊज नऊवारीच्या पेहरावाला एकदम रिच लूक देतात. नऊवारीवर ठुशी, कानसाखळ्या, तन्मणी, शाही हार, चिंचपेठी, मोठे झुमके, मोत्याचे तोडे, मोत्याची नथ असे दागिने जास्त उठून दिसतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News