सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न

डॉ मोहन राजमाने
Friday, 16 October 2020

प्रा सारिका सावंत यांनी वाचन ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येकाने रोज किमान एक तास तरी वाचन करायला हवे तसेच ग्रंथालयातील अनेक संदर्भ ग्रंथ विद्यार्थीदशेपासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसे मार्गदर्शक ठरतात याचे मार्गदर्शन केले. वाचनासाठी वेळ कसा काढावा, सोशल मिडियाचा वापर ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी कसा करावा यासाठी त्यांनी अंतरराष्ट्रीय किर्तीच्या व्यक्तींचा संदर्भ देऊन सखोल मार्गदर्शन केले.

सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराडमार्फत वाचन प्रेरणा दिन संपन्न

कराडः भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथील केशवराव पवार ग्रंथालयामार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त 'वाचन: यशाची गुरुकिल्ली' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई येथील एस एच पी टी स्कूल ऑफ लायब्ररी सायन्स विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ सारिका यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने हे होते.

प्रा सारिका सावंत यांनी वाचन ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येकाने रोज किमान एक तास तरी वाचन करायला हवे तसेच ग्रंथालयातील अनेक संदर्भ ग्रंथ विद्यार्थीदशेपासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसे मार्गदर्शक ठरतात याचे मार्गदर्शन केले. वाचनासाठी वेळ कसा काढावा, सोशल मिडियाचा वापर ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी कसा करावा यासाठी त्यांनी अंतरराष्ट्रीय किर्तीच्या व्यक्तींचा संदर्भ देऊन सखोल मार्गदर्शन केले.

शरीर सदृढ राहण्यासाठी जसे योग्य आहाराची, व्यायामची गरज असते अगदी त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची गरज असते. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचे धैर्य वाढते. वाचन ही मानवी जीवनातील दीर्घकालीन प्रक्रिया आहे. याचा समाज जीवनावर परिणाम होतो.

अनेक देशांची सर्वांगीण प्रगती झाली आहे ती त्या देशातील वाचन संस्कृतीमुळेच. आपण विद्यार्थीदशेमध्ये पाठ्यक्रमाची पुस्तके निरंतर वाचत असतोच परंतु याबरोबरच अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये कथा, कादंबरी, मोठ्या थोर व्यक्तींची चरित्रे तसेच इतर संदर्भ पुस्तकांच्या वाचनाची आवड विकसित केली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मोहन राजमाने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रसारण झूम व युट्यूब प्रणाली मार्फत करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनासाठी २५० विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार प्रा वंदना किशोर यांनी मानले तर संपूर्ण नियोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा महेश गायकवाड यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News