'रतनगड' ठरला ट्रेकर्ससाठी पर्वणीच

हर्षदा कोतवाल
Wednesday, 8 January 2020

रतनवाडी गावात वसलेला हा गड म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणीच आहे. या गडाला तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.

कळसूबाईच्या शिखर रांगेत उभा ठाकलेला, ज्याच्यासमोर भंडारदरा धरण, खालच्या बाजूला खोल अशी सांधण व्हॅली, गडावर पोचण्यासाठी तुडवावी लागणारी जंगलाची वाट आणि गडावर पसरलेल्या सोनकीच्या फुलांच्या पायघड्या बघायला कोणाला आवडणार नाही? तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी पाहायचं असल्यास रतनगड हा एकमेव पर्याय आहे.

रतनवाडी गावात वसलेला हा गड म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणीच आहे. या गडाला तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या गडावरून प्रवरा नदीचा उगम झाला आहे. या गडाचे सर्वांत महत्त्वाचे आकर्षण म्हणजे नेढं. नेढं म्हणजे एखाद्या डोंगराला असलेलं मोठं भगदाड. ज्यातून आपल्याला आरपार दोन दिशांना जाता येतं. या नेढ्यातून समोरील प्रवरा नदीचे नयनरम्य दृश्‍य पाहायला मिळते. रतनवाडी गावात पोचल्यावर अमृतेश्‍वर मंदिराशेजारीच असलेल्या हनुमान मंदिरात रात्रभर मुक्काम करता येतो. रात्रीच्या जेवणाची सोय करावी लागते. पहाटे लवकर उठून  प्रवरा नदीच्या डाव्याबाजूने ट्रेकला सुरुवात करता येते. तुमच्या समोर रतनगड स्पष्ट दिसतो. नेढ्यामुळं त्याला लगेच ओळखताही येतं.

रतनगडाच्या अगदीसमोर एक सुळका आहे ज्याला रतनगड खुट्टा म्हणतात. ट्रेकला सुरुवात झाल्यावर नुकतेच बांधलेलं धरण लागतं. या धरणाच्या भिंतीवरून पलीकडं जायचं आणि जंगलाच्या वाटेला लागायचं. काही मिनिटं सरळ रस्त्यानं चालत गेलं की दाट जंगल लागतं. जंगलात वाट चुकू नये म्हणून दगडांवर पांढऱ्या रंगानं खुणा केलेल्या आहेत. जंगल दाट असल्यानं उन्हाळ्यातही इथून जाताना उन्हाचा जास्त तडाखा जाणवत नाही. जंगल पार करून आपण लोखंडी शिड्यांपाशी पोचतो.

पावसाळ्यात या शिड्या निसरड्या होतात. त्यामुळं यावरून काळजीपूर्वक चढणं गरजेचं आहे. शिड्यांवरून चढून वर गेल्यावर आपण गडावर पोचतो. गडाला गणेश, हनुमान, त्र्यंबक आणि कोकण असे चार दरवाजे आहेत. गडावर पोचताच डाव्या टोकावर रत्नाईदेवीचं मंदिर आहे. त्याच्याच आजूबाजूला भली मोठी गुहा आहे. गडावरच टेंट टाकून मुक्काम करता येतो. पावसाळ्यानंतर दोन आठवड्यांच्या कालावधीत संपूर्ण गड सोनकीच्या फुलांनी बहरतो. गड खूप मोठा असून, त्यावर जवळपास सहा-सात टाकं आहेत. पावसाळ्यात आणि पुढचे दोन महिने त्यातं मुबलक पाणी असतं. गडाच्या एकदम अखेरच्या भागात गडाचं आकर्षण असलेलं नेढं आहे. नेढ्यातूनच खाली उतरून खुट्ट्याच्या समोरून परतीच्या मार्गाला लागता येतं. 

कधी जाल?

पावसाळ्यात हा ट्रेक थोडासा अवघड होऊ शकतो, त्यामुळे जाताना चांगल्या ग्रिपचे बूट आणि रेनकोट आणि किड्यांपासून वाचण्यासाठी पूर्ण कपडे असावेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे. या वेळी जाताना उन्हापासून वाचण्यासाठी पूर्ण कपडे, टोपी आणि सोबत जास्त पाणी असावे. 

रतनगडाबद्दल...

उंची : ४,२५५ फूट
लागणारा वेळ : 
रतनवाडीपासून ५-६ तास
पाण्याची सोय : पावसाळ्यात गडावर भरपूर पाणी असतं, इतरवेळी माणशी किमान दोन लीटर पाणी सोबत असावं.

कसे जाल?

 रतगडापासून सर्वांत जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे इगतपुरी. तिथून रतनगड फक्त २७ किलोमीटर आहे. भंडारदरा धरणातून बोटींग करूनही रतनवाडीला पोचता येते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News