रानू मंडलसारखीच श्रेया सजन हस्ताक्षरामुळे झाली सेलिब्रिटी

मुरलीधर कराळे
Monday, 24 February 2020

श्रेया सजन ही इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनीच्या सुंदर हस्ताक्षरामुळे तिच्या हस्ताक्षरातील तब्बल एक लाख पत्रिका छापल्याने ती रातोरात सेलिब्रिटी ठरली आहे.

नगर: रानू मंडल यांच्या गाण्याची दखल एका रात्रीत सोशल मीडियाने घेवून तिला देशपातळीवर पोचविले. राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांना नेटिझन्सने डोक्यावर घेतले, असाच प्रकार नगर जिल्ह्यात होत आहे. श्रेया सजन ही इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनीच्या सुंदर हस्ताक्षरामुळे तिच्या हस्ताक्षरातील तब्बल एक लाख पत्रिका छापल्याने ती रातोरात सेलिब्रिटी ठरली आहे.

शालेय हस्ताक्षर स्पर्धेत ती हस्ताक्षर काढताना तिच्या वडीलांनी व्हिडिओ सहज म्हणून सोशल मीडियावर शेअर केला. तो पाहून साहित्यिक नजर असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रशांत गडाख यांनी कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याच्या लाखभर पत्रिका तिच्याच हस्ताक्षरातील छापून तिचा अनोखा गौरव केला.

श्रेया गोरथनाथ सजन ही विद्यार्थीनी कडूवस्ती (सात्रळ, ता. राहुरी) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत आहे. तिचे हस्ताक्षर सुंदर आहे. हस्ताक्षरासाठी यापूर्वी विविध स्पर्धांत तिने बक्षिसे मिळविली आहेत. तिचे वडील त्याच शाळेत शिक्षक आहेत. हस्ताक्षर रेखाटताना तिच्या वडीलांनी सहज म्हणून एक व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल केला. हे सुंदर अक्षर पाहून नेटिझन्सने तिला डोक्यावर घेतले. फेसबूकवर हजारो लोकांनी कमेंट केल्या. लाईकही लाखाच्यावर गेल्या. हे हस्ताक्षर पाहून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी तिला फोन करून तिच्याशी बोलून अभिनंदन केले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही तिचे कौतुक केले. याबरोबरच अमेरिकेतील रहिवासी व मूळ भारतीय असलेल्या रोहित काळे यांनी तिचे अभिनंदन करून तिच्यासाठी खास कॅलिग्राफी सेट असलेले गिफ्ट पार्सल पाठविले. सुंदर हस्ताक्षरासाठी वडिलांबरोबरच तिचे वर्गशिक्षक राजेंद्र शिंदे यांचेही तिला विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

प्रशांत गडाख यांच्याकडून खास गौरव

जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात तिचे कौतुक होत असतानाच जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत गडाख यांनी तिला बोलावून आपल्या मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रणपत्र तयार करण्याचे सांगितले. कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यांत सन्मानमूर्ती न्या. नरेंद्र चपळगावकर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांचा गौरव करण्यात येत आहे. अशा या भव्यदिव्य होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका श्रेया सजन या विद्यार्थीने हस्ताक्षरात रेखाटली आहे. त्या पत्रिकेच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त पत्रिका छापून जिल्हाभर व राज्यभर वितरित करण्यात आल्या आहेत.

विशष म्हणजे श्रेयाचे नावही पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. पत्रिका समाजात जाताच रातोरात ही श्रेया कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या एका व्हिडिओमुळे आणि गडाख यांची साहित्यिक नजर तिला आता सातासमुद्रापार घेवून जात आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News