दैनंदिन आयुष्य जगताना, नोकरी, शिक्षण हे सर्व करत असताना विरंगुळा म्हणून गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगला जात असतो. परंतु, त्याठिकाणी फक्त ट्रेकिंग पर्यंत मर्यादित न राहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा देखील विचार केला पाहिजे, त्यामुळे इतिहासाला फक्त शिक्षणा पुरते व विरंगुळ्या पर्यंत मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार केला पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे, त्याला समृद्ध बनवण्यासाठी व रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या विचाराने मी व माझ्या मित्रांनी रेंज ट्रेकर्स ग्रुपची स्थापना केली.
रेंज या शब्दाचा अर्थ होतो दोन गोष्टी मधील प्रवास, दोन टोकांचा प्रवास. अडगळीत, दुर्लक्षित, झाडे नसल्यामुळे ओसाड पडत चाललेले आपले गड किल्ले ते सुंदर, सुशोभित, झाडांनी हिरवेगार झालेले गड किल्ले असा परिवर्तनाचा प्रवास घडवून आणण्याचा आमच्या या ग्रुपचा संकल्प आहे.
रयतेचे राज्य यावे म्हणून आपले अखंड परीश्रम घेणारे, प्रसंगी अंगावर वार झेलत, गनिमी कावा करत ज्यांनी स्वराज्य व सुराज्य निर्माण केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम या ग्रुप तर्फे केले जाते. ट्रेकिंग करत असताना जिथे जातो त्याठिकाणी स्वच्छता अभियान राबविणे, वृक्षारोपण करणे असे महत्वाचे उपक्रम रेंज ट्रेकर्स तर्फे केले जाते.
एक गड एक झाड
सह्याद्रीची व सर्व गड किल्यांची ओळख म्हणजे त्यात असलेली अनेक प्रकारची हिरवीगार झाडे. पण सध्याच्या घडीला यातील बऱ्याच झाडांची कत्तल झाल्यामुळे व काही झाडे नैसर्गिकरित्या संपुष्टात आले आहेत. त्यामुळे हे हिरवे सौंदर्य लोभ पावत चालले आहे. हीच गरज ओळखून ज्या गडावर जातो तिथे एक तरी झाड लावायचे हा संकल्प करत या उपक्रमाला सुरवात केली. हे झाड ज्या ठिकाणी लावतो त्याला व्यवस्थित कुंपण करणे, पाण्याची सोय असलेल्या व ते सुरक्षित अशी ठिकाणी झाड लावणे जेणेकरून ते जगेल आणि वाढेल ह्याची काळजी घेतली जाते.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर शौऱ्यपीठ तुळापूर येथे या ग्रुपच्या अधिकृत लोगोचे अनावरण केले. या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत राजगड, तोरणा, तिकोना, रायगड, लोहगड, व्याघ्रगड (वासोटा), प्रतापगड, देवगिरी किल्ला, विसापूर किल्ला, पन्हाळा किल्ला इत्यादी गड किल्यावर जाऊन स्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीचे कामे करण्यात आली. त्याचबरोबर १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतनिमित्त वाघोली येथील वाघेश्र्वर मंदिर येथे वृक्षारोपण तसेच जागतिक महिला दिनानिमित्त यझाकी कंपनी मधील महिला कर्मचाऱ्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
अवघ्या ३ लोकांच्या संकल्पनेतून सुरवात झालेल्या या ग्रुपमध्ये ४ महिन्याच्या आत ४० सदस्य जोडले गेले आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने महाराजांच्या इतिहासाचे तसेच ऐतिहासिक वास्तूंचे संगोपन करण्याची आज गरज आहे. म्हणून शेवटी आमच्या ग्रुपचे ब्रिद वाक्य, शिवछत्रपतींची भगवी पताका हाती घेऊ, चला मित्रांनो गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करू.!
(लेखक रेंज ट्रेकर्स ग्रुपचे संस्थापक सदस्य आहेत)