'रानकळी': प्रतीक्षाची चिंतनशील कविता

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
Saturday, 23 May 2020

दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे ढोरकष्ट आणि अखेर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे एक दुष्टचक्र झाले आहे. खेड्यापाड्यांतील विद्यार्थी आता ह्या दुष्टचक्राशी चांगलेच परिचित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नाहीत, म्हणून चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली होती. एका शाळकरी विद्यार्थिनीने आपल्या शेतकरी बापाची आत्महत्या टाळण्यासाठी कर्जमाफी करावी, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भावनिक आवाहन केले होते. आता ही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुली-मुले कल्पनारम्य व आभासी विश्वात रमण्याऐवजी खडतर वास्तवात वावरत आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितेत हे गंभीर विषय येत आहेत.

श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग-हरोली ( ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) ह्या शाळेत नवव्या वर्गात शिकणा-या सहा विद्यार्थिनींचे स्वतंत्र कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कवयित्री शिक्षिकांच्या सहवासामुळे ह्या विद्यार्थिनींना शब्दांशी खेळण्याचा छंद जडला आहे. यापूर्वी कु. लक्ष्मी बनसोडे, कु. साक्षी लाड आणि कु. अपूर्वा जगताप ह्या बालकवयित्रींच्या कवितासंग्रहांचा परिचय करून दिला आहे. आज कु. प्रतीक्षा पंढरीनाथ पाटील ह्या नववीतील विद्यार्थिनीच्या कवितेचा परिचय करून घेणार आहोत. कु. प्रतीक्षा पाटील हिचा 'रानकळी' हा कवितासंग्रह दि. १५. ११. २०१८ रोजी प्रकाशित झाला असून ३६ पृष्ठांच्या ह्या संग्रहात एकूण ३० कविता आहेत.

'बालपण' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा म्हणते:
'असे हे बालपण। जीवनाचे तोरण'
जीवनाचे तोरण असलेले हे बालपण हरवल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे.
शालेय जीवनात सामान्यतः इंग्रजी आणि गणित ह्या विषयांचा भयगंड बसलेला असतो. हेच दोन विषय विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाची दिशा ठरवत असतात. 'इंग्रजी' ह्या कवितेत हा भयगंड दूर करताना प्रतीक्षा लिहिते:
'काढा मनातून इंग्रजीची भीती
इंग्रजीपासून लपून लपणार किती?'
जगाची ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून इंग्रजी तशी सोपी आहे. त्यामुळे तिचा छंद जोपासा, अशी प्रेमळ सूचना ती आपल्या मित्र-मैत्रिणींना करते.

बालकुमारांच्या लेखनात आई, वडील, शिक्षक यांच्याविषयीच्या कविता हमखास येतात, कारण काळजातली ही नाती म्हणजे बालकुमारांचे अर्धेअधिक भावविश्व असते.
'आई' ह्या कवितेत कु. प्रतीक्षाची लेखणी अतिशय हळवी होते.
'जशी झाडाची साऊली
तशी माझी माऊली'
अशी ती सुरुवात करते. आई आपल्या वाटेतील काटे बाजूला सारते, याविषयीची कृतज्ञताही ती व्यक्त करते. आईची माया वाया जात नाही, असे सांगायलाही ती विसरत नाही.
कु. प्रतीक्षाच्या मायेचा तराजू अगदी संतुलित आहे.
'माझा बाप' ह्या कवितेत ती लिहिते :
'माया करतो बाप
त्याला नाही मोजमाप'.

मी आजवर मुलींच्या जेवढ्या कविता वाचल्या, त्यात प्रत्येक मुलीच्या स्वत्वाची भाषा जाणवते.
'मुलगी' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा सांगते, की मुलगी ही वंशाची पणती आहे. मुलगी ही घरची लक्ष्मी आहे. शेवटी समाजाला ती आवाहन करते:
'मुलींच्या पंखांना द्या बळ
मिळेल तिच्या श्रमाचे फळ'.

हल्ली मोबाईल हा जणू मानवी शरीराचा एक अवयवच बनला आहे.
'मोबाईल' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा म्हणते, मोबाईलमुळे माणसे वेडी झाली आहेत. ह्या मोबाईलमुळे जग बिघडत आहे, असे तिला वाटते. मोबाईलचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी शेवटी ती सुचविते:
'आता वेळ आहे आलेली
स्वत:ला सुधारण्याची
विज्ञान प्रगती करतच राहील
वेळ आहे स्वतःकडे पाहण्याची'.
विज्ञानाने नवनवीन आविष्कारांतून कितीही देऊ केले, तरी मानवाने आपल्याला सोसवेल तितकेच घ्यावे, ही प्रतीक्षाची समंजस जाण ह्या कवितेत व्यक्त झाली आहे.

मानवी मन अतिशय चंचल असते. ह्या चंचल मनाविषयी संत तुकारामांपासून बहिणाबाईंपर्यंत आणि अनेक आधुनिक कवींनीही कविता लिहिल्या आहेत.
'मन' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा लिहिते:
'माणसाच्या खूप असते मनात
पण तो सांगत नाही जनात'.
ह्या कवितेत कु. प्रतीक्षाने मानवी मनाचे विविध विभ्रम टिपले आहेत.

दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे ढोरकष्ट आणि अखेर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे एक दुष्टचक्र झाले आहे. खेड्यापाड्यांतील विद्यार्थी आता ह्या दुष्टचक्राशी चांगलेच परिचित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नाहीत, म्हणून चिठ्ठी लिहून ठेवून आत्महत्या केली होती. एका शाळकरी विद्यार्थिनीने आपल्या शेतकरी बापाची आत्महत्या टाळण्यासाठी कर्जमाफी करावी, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भावनिक आवाहन केले होते. आता ही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुली-मुले कल्पनारम्य व आभासी विश्वात रमण्याऐवजी खडतर वास्तवात वावरत आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितेत हे गंभीर विषय येत आहेत.

'दुष्काळ' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा पावसाला साकडे घालते:
'जगण्याची झाली भ्रांत
पावसा, ऐक ना रे आकांत!'
वेळेवर पाऊस पडत नसल्यामुळे प्रतीक्षाचे मन उदास होते. तिचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
'व्यथा' ह्या कवितेत ती लहरी पावसाला सुनावते :
'पड रे पावसा
असा नको रुसू
नुसती आशा दाखवून
आम्हाला नको फसवू'.
दुष्काळात उपजीविकेसाठी गाव सोडून परगावी जाताना शेतकऱ्यांच्या मनाला वेदना अतिशय होतात. पण जगण्यासाठी अखेर नाइलाज होतो. ह्या असहाय मन:स्थितीचे वर्णन करताना प्रतीक्षा लिहिते:
'... पण करायचे काय
शिक्का पडला 'दुष्काळग्रस्त'
सगळा गाव दुष्काळामुळे
झालाय त्रस्त!'

'तहानलेला गाव'ह्या कवितेत कु. प्रतीक्षाने दुष्काळग्रस्त भागाचे विदारक चित्र रेखाटले आहे.
जोवर पाऊस पडत नाही, तोवर गावखेड्याचे काहीच खरे नसते, म्हणून 'शेतकर्‍याचे मनोगत' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा पुन्हा एकदा पावसाला कळकळीची विनवणी करते:
'पाऊसराजा, ऐक ह्या कथा
जाऊ देत वाहून जन्माच्या व्यथा'
पावसाळी ढगांना दया येत नाही आणि कु. प्रतीक्षाची पावसाची प्रतीक्षाही संपत नाही. अशा वेळी शेवटी ती शेतकरी राजालाच विनविते:
'शेतकरी राजा नको घेऊ फास
नको सोडू तुझ्या जगण्याची आस'.

अशातच येतो दिवाळीचा सण. जरी शेती पिकली नाही, तरी ऋण काढून सण साजरे करण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी कु. प्रतीक्षाचे निसर्गाकडे मागणे आहे:
'दिवाळीने सरू दे
अंधार जीवनाचा
सगळी दु:खे विसरून
आस्वाद मिळो आनंदाचा! '

गरिबीत, दारिद्र्यात भरीस भर म्हणून ग्रामीण भागात व्यसने आश्रयाला येतात. 'व्यसन' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा लिहिते :
'धूम्रपान करून माणसे चुकती
व्यसनांपासून त्यांची होत नाही मुक्ती'
ह्याच कवितेत कु. प्रतीक्षा दारू, मावा, गुटखा, तंबाखू इ. व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करते.

कु. प्रतीक्षा पाटील ही ग्रामीण भागात शिकत असली, तरी तिने विज्ञानवादी दृष्टिकोन सोडलेला नाही. 'विज्ञानाचे युग' ह्या कवितेत ती म्हणते :
'विज्ञानाचा करू या स्वीकार
त्यानेच जगण्याला येईल आकार'.
कु. प्रतीक्षाने धरलेली विज्ञानाची कास ही तिच्या आधुनिकतेची साक्ष आहे.

कु. प्रतीक्षा नेहमी आपल्या कवितेतून जगाचाच विचार करते, तरीसुद्धा तिचा जगाविषयीचा अनुभव फारसा चांगला नाही. तिला सगळीकडे राजकारण दिसते आहे.
'जग' ह्या कवितेत ती लिहिते :
'असे असतेय जग
आता मला कळतेय
बघून हे सारे
मन माझे तळमळतेय'.
आपला जगाविषयीचा अनुभव फारसा चांगला नसला, तरी ती नाती जपायला प्राधान्य देते. 'नाती' ह्या कवितेत अतिशय समंजसपणे म्हणते:
'जपायचे असते नाते
नाहीतर ते तुटून जाते'.
पुढे ती म्हणते :
'रेशमाच्या धाग्यांनी
बनलेली असतात नाती
आपणच नकळत त्यांची
करून टाकतो माती'.
नाती जपण्याच्या बाबतीत कु. प्रतीक्षा किती संवेदनशील आहे, हे आपल्या लक्षात येते.

'माणूस' हा प्रतीक्षाच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. माणसाने नेहमी माणुसकीचे नाते जपावे, असे तिला वाटते.
म्हणूनच 'माणूस' ह्या कवितेच्या शेवटी ती लिहिते :
'कधी कुणाचे दुखवू नये मन
हेच आयुष्याचे आहे खरे धन!'

माणूस आणि माणुसकीला प्राधान्य देणारी प्रतीक्षाची कविता ही  जीवनाविषयी गंभीरपणे चिंतन करते. आपण जन्माला येताना एकटे आलो आणि जातानाही एकटेच जाणार आहोत. आपले चांगले कार्य हीच मोठी संपत्ती आहे, हे सांगताना 'जीवन' ह्या कवितेत कु. प्रतीक्षा सांगते:
'ह्या जीवनाच्या वाटे
असंख्य असतात काटे'.
ही जीवनजाणीव आहे नववीत शिकत असलेल्या १४ वर्षे वयाच्या कु. प्रतीक्षाची.

ह्या संग्रहात कु. प्रतीक्षाच्या रान, इच्छा, गरिबाचे स्वप्नातील घर, धरती, बापाची विनंती, इंद्रधनुष्य, पाऊस, दु:ख, व्यथा बापाची, शिक्षक, ओढा इ. विषयांवरच्या कविताही आहेत. कु. प्रतीक्षाची कविता ही अस्वस्थ करणारी आणि विचारांना चालना देणारी कविता आहे. कु. प्रतीक्षाच्या कविता वर्णनात्मक कमी आणि विश्लेषणात्मक अधिक आहेत.

सामान्यतः बालकुमारांच्या कवितेतील निसर्ग हा हलकाफुलका, प्रसन्न, अवखळ, खट्याळ आणि आनंददायी असा असतो. 'रानकळी' संग्रहातही निसर्गकविता आहेत, पण ह्या कवितेतील निसर्ग बराचसा उदास आणि विषण्ण करणारा आहे. सांगली जिल्ह्य़ातील शेतीमातीचे संस्कार घेऊन ही कविता अवतरली आहे. ही कविता अतिशय स्वाभाविक आहे. ह्या कवितेत कुठेही कृत्रिमता नाही. सुरेखा कांबळे आणि सौ. मनीषा पाटील यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिल्या आहेत.
'रानकळी'मध्ये बालकवितेचे पारंपरिक कल्पनारम्य विषय हद्दपार झाले आहेत. कु. प्रतीक्षा पाटील हिची 'रानकळी'मधील कविता ही गंभीरपणे जीवनविषयक विचार मांडणारी चिंतनशील कविता आहे!

'रानकळी' कवितासंग्रह
कवयित्री : कु. प्रतीक्षा पाटील
पृष्ठे : ३६      मूल्य रु. ४०

पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News