राजारामाची शकुंतला

संदीप काळे
Sunday, 10 May 2020

प्राध्यापक फार हुशार होते आणि मिश्किलही. मी जाण्यासाठी उठू लागताच माझा हात धरत ते म्हणाले : ‘‘अहो, आम्हाला आता एकांत नको आहे, आम्हाला तुमची संगत हवी आहे.  आमचं कुणीतरी ऐकून घेणारं, आमच्याशी कुणी तरी बोलणारं हवं आहे आम्हाला.’’ यावर मी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि पुन्हा त्यांच्याजवळ बसलो.

भोवऱ्यासारखं सतत फिरत राहणं हीच एक भाषा माझ्या पायांना समजते असं मला आता वाटू लागलंय!
लॉकडाउनच्या अगदी सुरुवातीच्या काळात फिरणं साहजिकच थांबलं होतं; पण काही ठिकाणी थोडीशी शिथिलता जाहीर होताच मी घराबाहेर पडलो, अर्थातच रीतसर पास घेऊन. लांबचा पल्ला गाठत मी परभणीत पोचलो. परभणीत थांबून दुसऱ्या दिवशी नांदेडला निघण्याचा बेत होता.
परभणीत सकाळी साडेसहा-सात वाजता पक्ष्यांच्या किलबिलाटानं आणि कोवळ्या सूर्यकिरणांनी मला झोपेतून जागं केलं. बहिणीच्या घरातून मी बाहेर डोकावलं. तिथल्या छोट्याशा बागेत मुलं आनंदानं बागडत होती. वयस्क माणसंही बागेत होती. असं वातावरण आम्हा मुंबईकरांना दिसणं तसं दुर्लभच म्हणावं लागेल.
मी तोंडावर पाणी मारलं. मोबाईल घेतला आणि त्या बागेत जाऊन बसलो. आजी-आजोबांची एक जोडी परस्परांचा हात हातात घेऊन बागेत शिरत असलेली दिसली. आजी कशाला तरी ठेचकाळल्या, थोड्याशा गडबडल्या आणि पुन्हा सावरल्या. सावकाश चालत जात दोघं एका निवांत ठिकाणी बसले.
बागेत आता गर्दी वाढत होती. अर्थात्, कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळूनच लोक वावरत होते. मी माझ्या मोबाईलमध्ये डोकं घातलं. थोड्या वेळानं चेहरा वर केला. बघतो तर काय, ते मघाचे आजी-आजोबा रडत असलेले दिसले. दोघंही एकमेकांना समजावणीच्या सुरात काही तरी सांगत असावेत असं वाटलं.
एकतर काहीतरी गंभीर घटना घडलेली असावी किंवा लॉकडाउनमुळे यांचं कुणी ना कुणी कुठंतरी अडकून पडलं असावं असा अंदाज मी केला.
थोडा वेळ मोबाईल बघ, थोडा वेळ बागेतलं वातावरण बघ असं माझं चाललं होतं. अशा प्रकारे अर्धा तास सहजच होऊन गेला होता. मी पुन्हा एकदा आजी-आजोबांकडं पाहिलं.
दोघांचं रडणं काही अजून थांबलं नव्हतं.
हे दोघं काही अडचणीत तर नसावेत ना, असा विचार माझ्या मनात आला व मी त्यांच्या दिशेनं जाणार तेवढ्यात माझा भाचा सुजित घोरबांड हा मला बोलवायला आला. म्हणाला : ‘‘मामा, घरी चला, आईनं लवकर बोलावलंय.’’
‘‘ठीक आहे,’’ असं म्हणत मी सुजितबरोबर निघालो.
जाताना मी सुजितला विचारलं : ‘‘हे आजी-आजोबा कोण आहेत? तुझ्या ओळखीचे आहेत का? ते का रडत असावेत?’’
तो म्हणाला : ‘‘आपल्या शेजारच्याच सोसायटीत राहतात. खूप मोठे प्रोफेसर होते ते. दोन महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी वारली, तेव्हा मी आणि बाबा त्यांच्याकडे गेलो होतो.’’
चालता चालता आम्ही आता आजी-आजोबा बसले होते तिथं आलो. मी जवळ येत असल्याचं दिसताच आजोबांनी रडणं थांबवलं. आजी जाड भिंगांच्या चष्म्यातून माझ्याकडे पाहत होत्या. मी जवळ जाऊन त्यांना विचारलं : ‘‘का रडता तुम्ही?काही झालंय का?’’
काही न बोलता आजोबांनी डोळे पुसले. माझ्या शेजारी असलेल्या सुजिकडे त्यांचं लक्ष गेलं. त्याला पाहताच ते भानावर येत म्हणाले :  ‘‘अरे घोरबांड, तू इकडं कसा काय?’’
माझ्याकडे हात दाखवत तो म्हणाला : ‘‘हे माझे मामा आहेत. ते इकडे फिरत फिरत बागेत आले होते. त्यांना बोलवायला मी आलोय.’’
आजोबा म्हणाले : ‘‘बरं, बरं, ठीक आहे.’’
तेवढ्यात सुजितला त्याच्या आईचा फोन आला. काही सामान आणायचं होतं, त्यामुळे तो घराकडे गेला.
मी आजोबांना विचारलं: ‘‘तुम्ही दोघंही खूप वेळपासून रडताय. काही झालंय का? सुजितनं मला सांगितलं तुमच्या पत्नीविषयी...’’
थोडा वेळ शांतता पसरली. मग आजोबा सावकाशपणे बोलू लागले. आजोबा धाडसी होते आणि स्वाभिमानीही, हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं. माझ्याविषयीची सगळी चौकशीही त्यांनी बारकाईनं केली.
आजोबांशी जे बोलणं झालं त्यातून कळलं ते असं :  
ते परभणीतल्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. यापूर्वी मी अनेक वेळा त्यांचं नावही ऐकलं होतं. आपल्या विषयात पांडित्य मिळवलेले हे प्राध्यापक विद्यार्थिप्रिय आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित होते.
‘‘या तुमच्या कोण आहेत?’’ मी आजींकडं हात दाखवत त्या प्राध्यापकांना विचारलं.
ते म्हणाले : ‘‘ती माझी नातलग आहे.’’
तेवढ्यावर आमचं बोलणं थांबलं.
पत्नीच्या निधनामुळं ते रडत असतील, तिची त्यांना खूप आठवण येत असेल या भावनेनं मी प्राध्यापकांच्या रडण्याकडं पाहत होतो. मात्र,
या क्षणी तरी त्या विषयावर ते दोघंही बोलत नव्हते. मात्र, दिवंगत पत्नीवर त्यांचं खूप प्रेम होतं हे प्राध्यापकांच्या बोलण्यातून जाणवत होतं.
प्राध्यापक हळूहळू मोकळेपणानं बोलू लागले.
तासभर आमच्या गप्पा रंगल्या. त्यांच्या सोबतच्या आजी फारशा बोलत नव्हत्या. दोघांच्याही हाताला मेंदी लावलेली होती.
‘‘ही मेंदी का लावली आहे?’’ असं विचारल्यानंतर दोघांच्याही रडण्याचं कारण प्राध्यापकांच्या बोलण्यातून समजलं.
प्राध्यापक म्हणाले : ‘‘लहानपणी हिला, म्हणजे शकुंतलाला, माझ्या हातावर मेंदी काढायला खूप आवडायचं आणि मलाही तिच्या हातावर मेंदी काढायला आवडायचं. मेंदीचा पाला कुटून आम्ही त्याच्या रसातून मेंदी तयार करायचो. मेंदी कुणाची जास्त रंगली हे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहण्याची खूप उत्सुकता असायची.’’
आता आजीही बोलू लागल्या. म्हणाल्या : ‘‘नेहमी माझीच मेहंदी रंगायची.’’
हे ऐकून प्राध्यापक खळखळून हसले आणि आजींकडे पाहून म्हणाले : ‘‘मी तुझ्या हातावर खूप चांगली मेंदी काढायचो ना, म्हणून ती रंगायची!’’
यावर आजींनी प्राध्यापकांच्या पाठीवर चक्क हलकीशी चापट मारली. प्राध्यापक पुन्हा हसले. प्राध्यापक बोलता बोलता पटकन बोलून गेले : ‘‘ही माझ्या मामाची मुलगी. लहानपणीच आमचं लग्न ठरलं होतं; पण काही कारणास्तव ते झालं नाही. सहा-सात वर्षं आम्ही सोबत राहिलो आणि मग कायमस्वरूपी ताटातूट झाल्यानंतर अगदी एवढ्यातच पुन्हा भेटलो.’’
‘‘किती वर्षे झाली असतील या घटनेला?’’ मी उत्सुकतेनं विचारलं.
प्राध्यापक म्हणाले : ‘‘आता माझं वय पंचाऐंशी वर्षांहूनही जास्त आहे. तेव्हा असेन मी दहा-अकरा वर्षांचा.’’
उत्सुकतेबरोबरच मी आता आश्चर्यचकितही झालो. अजब होतं हे!
इतक्‍या वर्षांनंतर हे दोघं एकत्र भेटले आहेत, तर त्यांचा आता अधिक वेळ घ्यायला नको म्हणून मी प्राध्यापकांना म्हणालो : ‘‘सर, मी आता निघतो, मला नांदेडला जायचं आहे.’’
प्राध्यापक फार हुशार होते आणि मिश्किलही. मी जाण्यासाठी उठू लागताच माझा हात धरत ते म्हणाले : ‘‘अहो, आम्हाला आता एकांत नको आहे, आम्हाला तुमची संगत हवी आहे.  आमचं कुणीतरी ऐकून घेणारं, आमच्याशी कुणी तरी बोलणारं हवं आहे आम्हाला.’’
यावर मी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि पुन्हा त्यांच्याजवळ बसलो. परत थोडंफार बोलणं झाल्यावर प्राध्यापक म्हणाले : ‘‘चला आमच्या घरी. मी  इथं जवळच राहतो. शकुंतलानं काल रात्री खूप छान शेंगोळी केली आहेत. थोडीशी शिल्लक आहेत. तुम्हालाही मजा येईल खायला.’’
खूप दिवसांनी शेंगोळी खायला मिळणार, असा विचार माझ्या मनात आला; पण मी अर्थातच तो बोलून दाखवला नाही. शेंगोळ्यांवर ताव मारता मारताच दोघांची लहानपणची लव्हस्टोरी ऐकण्याची मला खूप उत्कंठा होती.
माझ्या मनात जे जे होतं ते ते मी प्राध्यापकांना त्यांच्या घराकडे जात असताना चालता चालता विचारलं. ते शांतपणे उत्तरं देत होते. उत्तरं ऐकताना आजी मध्येच लाजत-संकोचत होत्या. पाचेक मिनिटांत आम्ही घरी पोचलो. फुले-शाहू-आंबेडकर, सानेगुरुजी, बाबा आमटे यांच्या फोटोंनी सजलेल्या घरात पुस्तकांचं भलं मोठं कपाट होतं. एका बाकावर प्राध्यापकांच्या पत्नीचा मोठा फोटो होता आणि त्याला मोगऱ्याचा ताजा हार घातलेला होता. तो सुगंध घरात दरवळत होता. मी बसलो. प्राध्यापकांनी फ्रिज उघडला.  फ्रिजमधूनही मोगऱ्याचा सुगंध येत होता. मोगऱ्याचा गजरा हातात घेत आजींकडे पाहून ते  म्हणाले : ‘‘अरे! हा गजरा मी तुझ्यासाठी तयार केला होता; पण तुला द्यायला विसरूनच गेलो मी.’’ त्यांनी आजींना गजरा दिला आणि मला पाणी. प्राध्यापकांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहत मी विचारलं : ‘‘काय झालं होतं यांना?’’
प्राध्यापक भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
‘‘काही नाही हो, चालता-फिरता गेली,’’ प्राध्यापकांनी सांगितलं आणि ते एकदम शांत झाले.
आजींनी रात्रीची शेंगोळी गरम करायला ठेवली होती. त्यांचाही घमघमाट सुटला होता.
प्राध्यापकांनी आपल्या लहानपणाची हकीकत  थोडक्‍यात सांगितली आणि शेंगोळी आणण्यासाठी ते आत गेले.
माणसाचं आयुष्य कशी कशी वळणं घेईल हे काही कुणाला सांगता यायचं नाही. मी ज्या प्राध्यापकांविषयी हे लिहिलं आहे त्यांचं नाव राजाराम तालेवार. मामाची मुलगी शकुंतला मालेवार हिच्याशी लहानपणीच त्यांचं लग्न ठरलं.
राजाराम यांचं पितृछत्र हरपलेलं होतं. लग्न ठरल्यानंतर राजाराम यांच्या काकांनी अकरा तोळे सोनं शकुंतला यांच्या वडिलांना दिलं. राजाराम आणि त्यांची आई दोघंही राजाराम यांच्या मामाकडे राहू लागले. शकुंतला आणि राजाराम एकत्रच वाढत होते.
‘राजारामकडे काहीच नाही, त्यामुळे आपली मुलगी शकुंतला त्याला द्यायची नाही,’अशी भूमिका शकुंतला यांच्या आईनं घेतली. आपल्यामुळे वाद व्हायला नकोत म्हणून राजाराम आईसह  दुसरीकडे राहायला गेले. त्यानंतर दोन्ही घरांचं नातंही तुटलं. मात्र, राजाराम-शकुंतला यांच्या मनात अंकुरलेलं प्रेम फुलायला सुरुवात झाली होती. मध्ये बरेच दिवस सरले. राजाराम यांचं लग्न दुसऱ्या मुलीशी झालं. त्यांना दोन अपत्यं झाली. शकुंतला यांचंही लग्न अन्य मुलाशी झालं. त्यांनाही दोन अपत्यं झाली. कालांतरानं शकुंतलाचा पती एका आजारामुळे लवकर मरण पावला. तेव्हा शकुंतला यांच्याकडे जाऊन त्यांना आधार द्यावा, हे धैर्य राजाराम यांना झालं नाही.
यावर राजाराम म्हणाले : ‘‘शकुंतलाचं दुःख मी पाहू शकलो नसतो.’’ नंतर अनेक वर्षांनी राजाराम यांचीही पत्नी वारली.  शकुंतला यांच्या मुलांनी आपल्या आईच्या राहण्याची स्वतंत्र सोय केली आणि राजाराम यांच्या मुलांनीही आपल्या वडिलांच्या राहण्याची स्वतंत्र सोय केली. दोघांकडे सगळं काही असूनही आज काहीच नव्हतं! या वयात दोघंही एकाकी पडले होते. त्यातच दोघांच्या भेटीचा योग आला आणि काही दिवसांपूर्वीच ते भेटले.
‘तुम्ही कुठं आहात आणि तुमचं कसं चाललंय,’ अशी दोघांचीही विचारपूस करणारं आता कुणी नाही. तसं हे दोघांसाठीही चांगलंच झालं असं एका परीनं म्हणता येईल. मग लहानपणी एकत्रित वाढताना दोघांनी जे जे केलं होतं ते ते त्यांनी अलीकडे भेट झाल्यानंतर मनसोक्तपणे  करायला सुरुवात केली. मेंदी, मोगऱ्याचा गजरा, शेंगोळी, खेळभांडी...अशा सगळ्या लहानपणीच्या आठवणी यानिमित्तानं दोघांनीही जागवल्या. तेव्हाची शकुंतला कशी होती हे प्राध्यापकांनी मला अगदी रंगवून सांगितलं. आपल्याकडे भरपूर काही असताना शकुंतलाची गरिबी आपण दूर करू शकलो नाही, अशी प्राध्यापकांना आजवर खंत होती. मात्र, आता आपण शकुंतलासाठी काय काय करणार आहोत ते प्राध्यापकांनी मला मोठ्या उत्साहानं सांगितलं.
शकुंतला यांच्या काही जुन्या वस्तू त्यांनी मला दाखवल्या.
एका हातात शेंगोळ्यांची थाळी आणि दुसऱ्या हाता पाण्याचा पेला घेऊन प्राध्यापक माझ्याकडे आले. वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या झुळकेनं प्राध्यापकांच्या पत्नीच्या फोटोवरचा हार खाली पडला. आतमधून शकुंतला आजी आल्या आणि त्यांनी तो हार फोटोला परत व्यवस्थितपणे घातला. विझलेला दिवाही त्यांनी परत लावला.
माझ्या आईच्या हातच्या शेंगोळ्यांची चव आणि या शेंगोळ्यांची चव एकसारखीच होती.
‘‘कशी झालीत शेंगोळी?’’ प्राध्यापकांनी मला दोन-तीन वेळा उत्सुकतेनं विचारलं
‘‘मस्तच,’’ मी म्हणालो.
शकुंतलाआजींच्या चेहऱ्यावरही कमालीचा आनंद दिसत होता. मी दोघांच्याही पाया पडलो आणि त्यांचा निरोप घेतला.  प्राध्यापकांनी माझा हात हातात घेतला.  
‘‘खूप छान वाटलं. तुम्ही भेटलात. पुन्हा नक्की या,’’ असं अगत्याचं निमंत्रण त्यांनी मला दिलं.  फ्रिजमधला एक गजराही  माझ्या हातावर ठेवला. मी निघालो...
प्रेम कुणाला कुठल्या वळणावर कसं घेऊन जाईल याचं हे उत्तम उदाहरण होतं. आयुष्याची ऐंशी-पंचाऐंशी वर्षे सरल्यानंतरही दोघांना एकमेकांसाठी काही तरी करायचंय...दोघांचं एकमेकांवर आजही खूप प्रेम आहे हे पाहून मीही कमालीचा सुखावून गेलो. कोण म्हणतं माणसामाणसांमधलं प्रेम संपलंय? आपल्या आजूबाजूला पाहा...प्रेमानं ओतप्रोत असलेले अनेक ‘राजाराम’ आणि अनेक ‘शकुंतला’ तुम्हाला दिसतील!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News