राज ठाकरेंनी केले सरकारचे कौतुक; जाणून घ्या काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 April 2020

आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही आश्‍वासक आहे. याबद्दल या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई: कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यांतील प्रशासन दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिकही प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत. त्यामुळे आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही आश्‍वासक आहे. याबद्दल या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज ठाकरे म्हणाले, कल्याणमध्ये तर 6 महिन्यांची मुलगी या आजारातून बरी होऊन घरी आली. तिच्यासारखे हजारो लोक या आजारावर मात करून बाहेर पडले आहेत, हे दिलासादायक आहे. पण या आकडेवारीला सरकारी पातळीवर ना पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली.

कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्यालाही योग्य प्रसिद्धी दिली गेली तर नागरिकांचा आपल्या डॉक्‍टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्‍वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवले गेले तर नागरिक लगेच बाहेर पडतील, असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि 3 मे पर्यंतच्या लॉकडाऊनचे लोक पालन करतील याविषयी शंका नाही.

याच्याशी निगडित दुसरा भाग म्हणजे या आजाराच्या नुसत्या शंकेनेही जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणे लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य, पण टीबीसारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असतानाही आपण त्या रुग्णांना वाळीत टाकले नाही तर आताच हे का, असा सवाल राज यांनी केला.

यावर एकच उपाय म्हणजे या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याची आकडेवारी देणारे एक "न्यूज बुलेटिन' आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जारी करावे. माध्यमांनीही या मुद्द्याचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज पुढे म्हणाले, माझे पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा, त्यावर सरसकट विश्‍वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News