पावसाला आळवणी...

मिलिंद उमरे
Tuesday, 13 August 2019

प्रलयाचे तुझ्या । समजले सार ।
निसर्गच थोर । सर्वोपरी ।।

नको तू पावसा । होऊस मुजोर ।
सरीचा हा जोर । आवर गा ।।

सृजनाचा त्राता । तूच सखा, बंधू ।
नको असे भांडू । धरणीशी ।।

आलास होऊनी । जसा काही काळ। 
मातेसह बाळ । बुडाले रे ।।

बुडालेली गावे । विझलेली चूल ।
जणू मृत्यूभूल । पडलेली ।।

बंगल्यास नाही । झोपडीची चिंता ।
कोण्या भगवंता । आळवावे ।।

देऊळ, मशीद । सारेच बुडाले ।
एकरूप झाले । धर्म सारे ।।

 धर्म आता फक्त । एक उरलाहे ।
माणुसकी आहे । नाव त्याचे ।।

विकासाच्या नावे । पेटविले रान ।
त्यांना यावे भान । आतातरी ।।

आतातरी व्हावे । माणसाने सुज्ञ ।
निसर्ग ना अज्ञ । समजावे ।।

पोखरी डोंगर । कापतो जो राने ।
अशा मानवाने । सुधारावे ।।

प्रलयाचे तुझ्या । समजले सार ।
निसर्गच थोर । सर्वोपरी ।।

तरी बा पावसा । थांबव प्रलय ।
जगण्याची लय । गवसू दे ।।

'मिलिंद' म्हणतो । शांत हो ना जरा ।
बुडेल ही धरा । आकांताने ।।

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News