रेल्वे कर्मचारी झालेत डिजिटल... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

अकरा लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एकच ॲप्लिकेशन
रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानतेत महत्त्वाचे पाऊल

नाशिक : मध्य रेल्वेने देशातील ११.१९ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना एक खिडकी योजनेच्या धर्तीवर एकत्र आणणारे देशव्यापी अद्ययावत मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल ॲप्लिकेशनवर एकत्रित माहिती असलेले, हे देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कामकाजात एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 

संबंधित रेल्वे ॲप्लिकेशनमध्ये कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड, ई-सेवेसह विविध प्रकारचे रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज ह्या ॲप्लिकेशन (एचआरएमएस) चा शुभारंभ केला. रेल्वेच्या सूचना केंद्राने विकसित केलेल्या या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित एकत्रित स्वरूपातील माहिती आहे. मोबाइल ॲप्लिकेशनमुळे कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक डेटा पाहण्याची परवानगी मिळणार आहे. त्यात कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, पदोन्नती, पुरस्काराविषयीची माहिती असेलच; पण कर्मचाऱ्यांच्या बदल्या, विविध प्रकारचे आदेश, सार्वजनिक सुट्या, प्रशिक्षण शिबिर निवृत्तीविषयक  लाभासाठी अर्ज करता येणार आहे.

सध्या स्थितीत, रेल्वेच्या अवाढव्य प्रशासकीय यंत्रणेत कामगार विषयक अर्ज, विनंती बदल्यासह विविध कामासाठी कार्यालयामार्फत कामकाजावर विसंबून रहावे लागते. नव्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे कर्मचाऱ्यांना एक खिडकी योजनेच्या धर्तीवर एका मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे कामकाज करता येणार आहे. रेल्वेच्या सेवेत सद्यःस्थितीत ११ लाख १९ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केलेली आहे. त्यात महत्त्वाच्या मोबाईल लिंकही असणार आहे.  #गुगल प्ले स्टोअरमध्ये - एचआरएमएस एम्प्लॉयी मोबाईल ॲप फॉर इंडियन या नावाने उपलब्ध असून प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्यांला आयपीएस क्र. / पीएफ क्र. सह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून कर्मचाऱ्यांना मोबाईल ॲप्लिकेशनचा लाभ होणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News