जनजागृती अन्‌ दुर्ग स्वच्छतेसाठी रायगडस्वारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी साजरा होणार आहे. यासाठी विविध संघटना, संस्था, दुर्गप्रेमी रायगडावर गर्दी करत आहेत. यातील एक साह्य कडा ॲडव्हेंचर संस्था अनोख्या ध्येयाने रायगडावर दाखल होणार आहे.

पाली - शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी साजरा होणार आहे. यासाठी विविध संघटना, संस्था, दुर्गप्रेमी रायगडावर गर्दी करत आहेत. यातील एक साह्य कडा ॲडव्हेंचर संस्था अनोख्या ध्येयाने रायगडावर दाखल होणार आहे. सायकलिंग आणि आरोग्यासंदर्भात जनजागृती व्हावी, शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांपर्यंत पोहचावा, दुर्ग स्वच्छता या उद्देशाने पिंपरी-चिंचवड येथील साह्य कडा ॲडव्हेंचर संस्थेचे साहसी दुर्गप्रेमी चार वर्षांपासून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सायकलने जातात. 

साह्य कडा ॲडव्हेंचर संस्थेचे १५ सायकलस्वार शनिवारी  पहाटे ४ वाजता पिंपरी-चिंचवड येथून तयारीनिशी निघाले. दुपारी १२ च्या दरम्यान हे सायकलस्वार पालीत दाखल झाले. ‘सकाळ’ने त्यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा संस्थेचे अध्यक्ष बाबाजी चौधरी म्हणाले की, गडाचे पवित्र राखणे याबरोबरच सायकलिंग आणि आरोग्यासंदर्भात जनमानसांत जनजागृती व्हावी, शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांपर्यंत पोहचावा आणि दुर्ग स्वच्छता आदी उद्देशाने आम्ही ही मोहीम दर वर्षी राबवत आहोत. हे दुर्गप्रेमी शनिवारी रात्री रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचले आणि रविवारी सकाळी रायगड किल्ल्यावर स्वच्छतेसाठी गेले आहेत. पिंपरी-चिंचवडपासून रायगड किल्ला हे अंतर १७० किमी आहे. मागील तीन वर्षे ते मुळशी वरून ताम्हणी घाटमार्ग रायगडावर जात होते.

मात्र, या मार्गाची दुरवस्था झाल्याने ते या वर्षी लोणावळ्यावरून पालीमार्गे रायगडावर गेले आहेत.  या सायकलस्वारांमध्ये साह्य कडा ॲडव्हेंचरचे अध्यक्ष बाबाजी चौधरी, शंकर पाटील, नागनाथ दोडके, महेंद्र पोटकुले असे मिळून १५ दुर्गप्रेमी सायकल घेऊन आले आहेत. यामध्ये साडेसहा वर्षांच्या लहानग्याचाही समावेश आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी इतर चार जणांची टीमही आहे. महेंद्र पोटकुले हे या टीमचे नेतृत्व करत आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News