मोगल सलतनच्या जीवावर उठलेला रायगड...

किशोर गरुड
Friday, 17 May 2019

मोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्‍य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते.

मोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्‍य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते.

सुरतलुटीनंतर नाशिक, बागलाण व दिल्लीकर पातशहाच्या मुलखामध्ये शिवाजीराजांनी एकच उडदंग माजविला होता. तेव्हा शिवाजीला धडा शिकविण्यासाठी औरंगजेबाने रणनीती आखायला सुरवात केली. दक्षिण मुलखाची खडान्‌खडा माहिती असणाऱ्या महम्मद कुलीखान नावाच्या सरदाराची निवड केली. तो पंजाबामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहत होता. औरंगजेब कमालीचा संशयी आणि सावध स्वभावाचा होता. त्याने कुलीखानाची कठोर परीक्षा घेतलीच; शिवाय त्याच्या जवळच्या सरदाराने पातशहाला असा अहवाल दिला की "कुलीखान हा बंदा इतका एकनिष्ठ आहे की, एकेकाळी आपण मरगठ्ठा होतो, हेही तो पूर्णपणे विसरून गेला आहे. हा बाटगा या जन्मी तरी पातशहा सलामतना सोडून जाणार नाही.

आपण हवी तशी कामगिरी त्याच्याकडून पार पाडू शकू, खाविंद!' शिवाजीराजांना मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या तडाख्यापुढे पुरंदरचा नामुष्कीचा तह मान्य करावा लागला होता. स्वराज्यातील बलाढ्य अशा २३ किल्ल्यांवर उदक सोडावे लागले होते. त्याच दरम्यान पन्हाळ्याच्या मोहिमेत पोचायला नेताजी पालकरला उशीर झाला. त्यामुळे राजांनी त्याची खरडपट्टी काढली, तेव्हा चिडलेल्या नेताजीने राजांना उलट जबाब केला ः ""आपण तरी कसले राजे? आणि आम्ही तरी कसले सेनापती? आता आपण मोगलांचे मनसबदार आहात!'' तेव्हा राजांनी नेताजी पालकरला तत्काळ बडतर्फ केले. त्यामुळे तो स्वराज्यातून निघून आदिलशहाकडे गेला. मात्र, हुशार मिर्झाराजाने त्याला सरळ दिल्लीकर औरंगजेबाच्या सेवेत नेऊन दाखल केले. औरंगजेबाने नेताजीसारखे रत्न तना-मनाने पातशीही सेवेत घ्यायचे ठरविले. 

त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्याच्या दोन्ही स्त्रियांना पातशहाने दटावून विचारले, "तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या नव्या धर्मात येता की आमच्या वहिवाटीप्रमाणे आम्हीच एखाद्या शहजादीशी याची शादी करून देऊ?'' तेव्हा नवऱ्यासाठी दोघींनी परधर्म स्वीकारला.

जेव्हा दहा पावसाळे उलटलेले, तेव्हा महम्मद कुलीखान आचार-विचाराने पुरा खानसाहेबच बनलेला. शिवाजीचे नुकसान करायचे या इराद्यानेच तो इंदापूर-माणगावच्या रानात येऊन पोचला होता. मात्र, जेव्हा त्याने दूरवर दिसणारा रायगड पाहिला, तेव्हा त्याच्या अंगावरचा पातशाही जामानिमा खाली गळून पडला. झाडांना मिठ्या मारत, इथल्या वाऱ्यावर तरंगत, अश्रू ढाळत, धावत-पळतच तो रायगड चढला. शिवरायांच्या पायावर जाऊन गडबडा लोळला; तेव्हा, "नेताजी बहाद्दरा,' अशी हाक मारत राजांनी त्याला पोटाशी धरले. त्याचे शुद्धीकरण करून त्याला स्वधर्मात आणि स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे हाच कित्ता त्याच रायगडावर राज्य करताना संभाजीराजांनी गिरवला. हरसूलच्या कुलकर्ण्यासह अनेकांना स्वधर्मात व स्वराज्यात माघारा घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News