धूम्रपान सोडण्यासाठी हे करा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • धूम्रपान सोडण्याची तारीख निश्‍चित करा आणि आपल्याजवळ असलेल्या लोकांना त्याबद्दल माहिती द्या. धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नात आपले कुटुंब आणि मित्रांना सहभागी करून घ्या.

धूम्रपान सोडणे कठीण, परंतु शक्य आहे. लाखो लोकांनी धूम्रपान यशस्वीरीत्या सोडले असून, ते निरोगी आयुष्य जगत आहेत. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले, की एकूण धूम्रपान करणाऱ्यांपैकी ७० टक्के लोक धूम्रपान सोडू इच्छितात. परंतु त्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज असते. नेमके कशामुळे धूम्रपान करण्याची इच्छा होते, ते जाणून घ्या. उदाहरणार्थ- तुम्ही ड्रायव्हिंग करताना किंवा तणावग्रस्त असताना धूम्रपान करता का? प्रत्येक कारण हाताळण्यासाठी एक योजना तयार करा.

धूम्रपान सोडण्याची तारीख निश्‍चित करा आणि आपल्याजवळ असलेल्या लोकांना त्याबद्दल माहिती द्या. धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नात आपले कुटुंब आणि मित्रांना सहभागी करून घ्या. काही जणांमध्ये निकोटिनपर्यायी औषधे धूम्रपानाची सवय मोडण्यास मदत करू शकतात. निकोटिनपर्यायी औषधांनी धूम्रपानाची उत्कट इच्छा पूर्ण करण्यासाठी धूम्रपान करणाऱ्यांना निकोटिन देणे सुरू ठेवले जाते.

तथापि, निकोटिनपर्यायी औषधांमध्ये धूम्रपानातून उत्सर्जित होणारे टार आणि विषारी वायू नसतात. निकोटिनपर्यायी औषधांतील निकोटिनचे प्रमाण आपल्याला कमी कमी करत बंद करता येते. खालील औषधे धूम्रपान कमी करण्यास उपलब्ध आहेत.

निकोटिन च्युइंग गम : निकोटीन सोडल्यानंतरची लक्षणे (विथड्रॉवल) कमी करण्यासाठी थोड्या प्रमाणात निकोटिन असणारे च्युइंग गम मदत करते.  निकोटिन पॅच : धूम्रपान करण्याची इच्छा कमी करण्यास मदत करण्यासाठी निकोटिनचा स्थिर आणि कमी डोस देणारा पॅच दिवसातून एकदा  त्वचेवर लावता येतो.  धूम्रपान सोडण्यात मदत करण्यासाठी औषधे:

बुप्रोपियॉन : धूम्रपान करणे थांबविण्यास लोकांना मदत करण्यासाठी हा एक नॉन-निकोटिन पर्याय आहे. धूम्रपान सोडण्याची इच्छा असणाऱ्यांना हे औषध गोळीच्या स्वरूपात दिले जाते, ब्युप्रोपियन व्यसनमुक्तीशी जोडलेल्या मेंदूतील रसायनांचे प्रमाण बदलते आणि धूम्रपानाची इच्छा कमी करते.  

व्हॅरनेकलीन :  धूम्रपान सोडण्यात मदत करण्यासाठी ही एक नॉन-निकोटिनची गोळी आहे. हे औषध मेंदूतील निकोटीन रिसेप्टर्सला लक्ष्य करते. व्हॅरॅन्सीलाइन रिसेप्टरला जोडते आणि निकोटीनला मेंदूपर्यंत पोचण्यापासून रोखते. यामुळे धूम्रपानाची इच्छा कमी होते. वरील सर्व उपचार आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच घ्यावेत. धूम्रपान सोडल्यानंतर ते पुन्हा नियमितपणे सुरू केल्यास निराश होऊ नये.

त्याऐवजी, पुन्हा आपल्या मार्गावर परत येण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते शोधावे. धूम्रपान सोडण्याची नवीन तारीख निश्चित करा. आपल्या कुटुंबास आणि मित्रांना मदत करण्यासाठी सांगा. धूम्रपान करणारे बहुतेक लोक यशस्वी होण्याआधी धूम्रपान सोडण्याचे बरेच अयशस्वी प्रयत्न करतात. तरीही जिद्दीने हे प्रयत्न सुरू ठेवल्यास आपल्याला यश मिळेल व आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी होण्यास मदत होईल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News