भारतीय क्रिकेट मंडळाकडून महिला क्रिकेटबद्दल प्रश्नचिन्ह 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

भारतीय क्रिकेट मंडळ कोरोनानंतरच्या क्रिकेट पुनरागमनाची चर्चा करीत असताना महिला क्रिकेटबद्दल चर्चाही करायला तयार नाही.

भारतीय क्रिकेट मंडळ कोरोनानंतरच्या क्रिकेट पुनरागमनाची चर्चा करीत असताना महिला क्रिकेटबद्दल चर्चाही करायला तयार नाही. महिलांचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेत उपविजेता होता. ही स्पर्धा मार्चमध्ये झाली होती. आता विश्वकरंडक महिला एकदिवसीय स्पर्धा फेब्रुवारीत होणार आहे; पण त्यापूर्वी भारतीय संघ एखादा सामनाही खेळण्याची शक्‍यता कमी आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ इंग्लंडला खेळण्यासाठी जात आहेत; पण भारतीय क्रिकेट मंडळ आपल्या महिला संघास इंग्लंडला खेळण्यास पाठवण्यास तयार नाही, त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्याची संधी हुकली आहे.

निवड समिती नियुक्तीही लांबणीवर
महिला क्रिकेटच्या लढती घ्यायच्या नाहीत आणि त्या लढती कुठे आहेत, असे विचारत राष्ट्रीय महिला निवड समितीची नियुक्ती लांबणीवर टाकली जात आहे. भारतीय मंडळाच्या कार्यकारी परिषदेत गांगुली यांनी विश्वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धा पूर्वघोषित कार्यक्रमानुसार होणार असे सांगितले होते, पण या व्यतिरिक्त याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे समजते. हेमलता काला अध्यक्ष असलेली निवड समितीची मुदत जानेवारीत संपली आहे.

महिला चॅलेंजरसाठी बिग बॅशचे कारण
आयपीएल अमिरातीत होत असताना महिला चॅलेंजरची कोणतीही चर्चा सुरू नाही. याबाबत विचारणा केल्यावर भारतीय मंडळाचे पदाधिकारी याच कालावधीत ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग आहे, याचे कारण देतात; मात्र ऑस्ट्रेलियातील आघाडीचे पुरुष क्रिकेटपटू याच लीगला पसंती देण्याचीही शक्‍यता आहे, याचा विसर भारतीय मंडळास पडत आहे. विश्वकरंडक महिला ट्‌वेंटी 20 अंतिम सामन्यास विक्रमी प्रतिसाद, तसेच दूरचित्रवाणी प्रेक्षक लाभले होते. त्यानंतरही भारतीय मंडळ त्यांच्याकडे पाठच फिरवत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News