कतार 2032 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • दोन वर्षांनी विश्वकरंडक फुटबॉलचे यजमानपद भूषवणाऱ्या कतारने 2032 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

दोहा:  दोन वर्षांनी विश्वकरंडक फुटबॉलचे यजमानपद भूषवणाऱ्या कतारने 2032 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी 2032 च्या ऑलिंपिक संयोजनासाठी भारत प्रयत्न करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

कतारने 2032 च्या ऑलिंपिक संयोजनात नव्याने उडी घेतली आहे. यापूर्वीच भारत, क्वीन्सलॅंड (ऑस्ट्रेलिया), शांघाय (चीन) आणि संयुक्त कोरिया यांनी यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. ऑलिंपिकचे यजमान होऊ इच्छिणाऱ्या देशांना याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस कळवणे आवश्‍यक असते आणि त्यानंतर दोघांत चर्चा होते. कतारने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

कतारने आपण ऑलिंपिक यजमानपद शर्यतीत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या भविष्यातील यजमान निवड आयोगाबरोबर संपर्क साधला आहे, असे त्यानी सांगितले. कतारने यापूर्वी 2016 आणि 2020 च्या ऑलिंपिकसाठी प्रयत्न केले होते. कतारने 2020 चे ऑलिंपिक हे अझरबैझानसह (बाकू) घेण्याची तयारी दाखवली होती.

कतारला किती पाठिंबा लाभणार, हा प्रश्नच आहे. तेथील तपमान उन्हाळ्यात 50 अंशापर्यंत जाते. गतवर्षी जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या वेळी स्पर्धकांची हवामानाने परीक्षा घेतली होती, तसेच चाहतेही फारसे आले नव्हते. कतारने जिंकलेले विश्वकरंडक फुटबॉल यजमानपदात भ्रष्टाचार असल्याची टीका होत आहे.

भारताचीही तयारी पण...
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी मे महिन्यात भारत 2026 च्या युवा ऑलिंपिक तसेच 2032 च्या ऑलिंपिक संयोजनास उत्सुक असल्याचे सांगितले होते. आम्ही 2032 च्या ऑलिंपिक यजमानपदासाठी निविदा सादर करण्याची पूर्वतयारी सुरू केली होती; पण कोरोना महामारीमुळे सर्व काही थांबले आहे. ही दीर्घकालीन प्रक्रिया असते; पण सध्या सर्व काही थांबले आहे. डिसेंबरपर्यंत काहीही घडणार नाही, असे बत्रा यांनी त्या वेळी सांगितले होते; पण त्यापूर्वीच कतारने यजमानपदात उतरले असल्याचे जाहीर केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News