न्‍यूनगंड बाजूला ठेवून आत्मविश्‍वासाने प्रयत्न केल्यास यश नक्‍कीच मिळते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

व्यक्तिमत्त्वाविषयी कधीही न्यूनगंड बाळगू नये, तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करा, आत्मविश्वास वाढवा, व्यक्तिमत्त्वाचा विकास करा, कुठल्याही मुलाखतीला यशस्वी सामोरे जाऊन यशस्वी व्हाल

पनवेल : नोकरीसाठी मुलाखतीला जाताना तरुणांमध्ये न्यूनगंडाची भावना असते. आत्मविश्‍वासाच्या अभावामुळे अनेक जण मुलाखतीमध्ये मागे पडतात. हा न्यूनगंड बाजूला सारून मुलाखत यशस्वी पार पाडण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे, असे आवाहन समुपदेशक अंकित जैन यांनी विद्यार्थ्यांना केले. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्‍वासनाने प्रयत्न केल्यास यश नक्‍कीच मिळते, असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला.

कळंबोळीमध्ये ‘सकाळ यिन नेटवर्क’ आणि ‘शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालया’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपंचाग, ‘सकाळ यिन’चे तेजस गुजराती, प्रा. डॉ. बी. बी. जाधव, प्रा. डॉ. भारती आरोटे, प्रा. अनिता म्हात्रे आदी उपस्थित होते. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्त्वाविषयी कधीही न्यूनगंड बाळगू नये, तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करा, आत्मविश्वास वाढवा, व्यक्तिमत्त्वाचा विकास करा, कुठल्याही मुलाखतीला यशस्वी सामोरे जाऊन यशस्वी व्हाल, मुलाखत घेणाऱ्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कसा पडेल, याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. 

समुपदेशक अंकित जैन यांनी विद्यार्थ्यांना नोकरीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या मुलाखतीविषयी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. ‘सकाळ यिन’ने व्यावसायिक व्याख्यानाचा कार्यक्रम  राबवून विद्यार्थ्यांना केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपंचाग यांनी धन्यवाद मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News