पुरणपोळी

स्नेहल भोसले
Saturday, 26 September 2020

या पुरणपोळीचे खूप नखरे असतात. म्हणजे नाजूक साजूक पदार्थ आहे ना. मग असणारच. 

पुरणपोळी
 
माझी आई फार सुंदर पुरणपोळ्या करते... दिसायला इतक्या तलम की हात लावायचा मोह होतो आणि वाटते उचलायची भीती... अलवार... नाजूक....अलगद उचलाव्यात. गृहिणीची खरी कसरतच असते. गृहिणीच्या हाती कसब लागतं आणि थोडं डोकंही.

भारतभरच्या प्रवासात पुरणपोळी.. वेडमी, बोळी, होळीगे, बोबटलू, ओपुट्टु, उबट्टी... आश्या बऱ्याच नावाने ओळखली जाते .काहीही म्हणा, महाराष्ट्रातील पुरणपोळीची मजाच वेगळी! चवीला तर इतक्या सुंदर की तोंडात टाकताच विरघळाव्यात. किती खटपटीचा पदार्थ आहे खरंतर. मी कधी केल्याचं मला तरी आठवतं नाही. पण आई करते... आणि इतक्या सुंदर करते की अहाहा!! होऊन जातं. इतक्या झटपट करते आणि मिनिटाला एक, की आपण बघतच राहतो. निदान मी तरी.

पुरणपोळीचे उंडे भरायला म्हणे खूप कसब लागतं. असेलच. त्याशिवाय इतक्या सुंदर होतात का? सोनार कसा दागिने घडवतो. बारीक छिन्नीने. अगदी लागेल न लागेलसे ठोके मारतो. तसा कणकेच्या गोळ्यात पुरणाचा गोळा अलगद भरावा लागतो. कधी मैदा. कधी अर्धी कणिक अर्धा मैदा. मला करण्याची वेळ अजून तरी आली नाही. माझी आई सुगरण. मी खरंच फक्त खाण्याचं काम केलंय. आणि खरं सांगू का, भीतीच वाटते मला पुरणपोळी करायची. म्हणजे इतका खटाटोप, परत इतकं निगुतीनं करून ती मोडली तर टाकताना?  त्यामुळे मी सरळ ती खाते. अगदी मनापासून आणि करणाऱ्या आईचं खूप कौतुक करते. ते पण मनापासून.

या पुरणपोळीचे खूप नखरे असतात. म्हणजे नाजूक साजूक पदार्थ आहे ना. मग असणारच. पुरण एकदम परफेक्ट व्हावं लागतं.थोडंसं जरी पातळ झालं तर लाटणार कशी ना पोळी. त्या पुरणाला मग हसणारं पुरण म्हणतात. केल्या नाही तरी शब्द माहितच असतात, नाही? असं हसणारं पुरण मग भरपूर वेळ आळवत बसावं लागतं. डाळ शिजवताना पण सगळं अंदाजानं करावं लागतं. किती पाणी घालायचं. किती शिट्या द्यायच्या. का बाहेर शिजवायची. मग ती फार वेळ थंड न होऊ देता गरम गरमच पुरणयंत्रात वाटायची. गंधासारखी. ती गरम डाळ पुरणयंत्रात ओतताना चटका बसू शकतो. तसं तर पुरण शिजवतांना पण त्याचे थेंब उडतात बाहेर आणि चांगलाच सणसणीत चटका बसतो.

लहानपणी आई हे सगळं करत असतांना मी तिथेच उभं राहून बघत असे. टक लावून. इतका कठीण पदार्थ कसा ना काही जणींना झटपट जमू शकतो. मला भारी नवल वाटतं. आधी मुळात इतकं काही नाजूकपणे करतांना त्यांना धडधडत कसं नाही ह्याचंच मला नवल वाटतं. छान पुरणपोळी लाटणं म्हणजे कमी कौशल्याचं काम समजू नका. जरा जरी जोराने लाटली की काय होतं त्याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. लाटताना लागणारं कसब, ती पोळी अलगदपणे लाटण्यावर घेऊन तापलेल्या तव्यावर टाकणं म्हणजे अगदीच “दे माय धरणी ठाय” करून टाकणारं काम. मी तर अशा वेळी पटकन डोळेच मिटून घेते. कारण मला अशावेळी असं सारखं वाटतं की आता जर ही पोळी सटकलीच, तर काय?

मग असं सगळं हळुवारपणे करत करत ती पोळी तापल्या तव्यावर टाकली जाते. त्याचं पण खूप काही आहे, माहितेय. म्हणजे तवा गरम तर पाहिजे. चांगला कडकडीत. पण बारीक गॅसवर तापवलेलाच हवा. पोळी तव्यावर टाकली तरी गॅस बारीकच ठेवायचा म्हणे. नाहीतर, केलाय आपला भस्सकन मोठा असं चालत नाही. पुरणपोळीचा असा नखराच खूप. पण मंद गॅसवर तुम्ही ती पुरणपोळी जेव्हा शेकता, भाजता हा शब्द मला अगदी आवडतं नाही, निदान पुरणपोळीच्या बाबतीत तर नाहीच, किती निगुतीनं करायचा पदार्थ आहे हा, मग शब्द सुद्धा पारखून निवडून घ्यायला नको? तर तुम्ही ती जेव्हा छान शेकवता तेव्हा जो सुवास दरवळतो त्याला अनुभवावंच लागतं.

लिहून, सांगून, वाचून ते कळणारं नाही. परत ती पोळी दुसऱ्या बाजूनं शेकण्यासाठी पलटतांना परत एकदा जीव वर खाली होतो माझा. एकूणातच हे पुरणपोळी प्रकरण म्हणजे जत्रेतल्या पाळण्यात बसणं आहे. पाळण्यात आहोत तोपर्यंत आपला वरचा श्वास वर आणि खालचा खाली. परत वरून खाली येताना पोटांत येणारा मोठ्ठा भीतीचा गोळा आहेच कायम. पण तरीही आपल्याला त्यात बसायची, निदान एकदा तरी बसून बघायची किती हौस नां. तसंच होतं असेल नाही त्या सुगरणीचं सुद्धा. निदान पुरणपोळी करतांना. मला आठवतंय माझी आई असे काहीही खटपटीचे पदार्थ करतांना नेहमी ‘ओम नमः शिवाय’ म्हणतं असे. नाव कोणाचं घेतात आणि कोण हे कुठं महत्वाचं असतं. असते महत्वाची ती भावना आणि मनाची होणारी धाकधूक.

- स्नेहल भोसले

टीवाय बीसीए (सायन्स), एचव्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News