न केलेल्या अपराधाची शिक्षा 

सुदर्शन चव्हाण
Friday, 29 May 2020
  • वेबसीरिज : आलियास ग्रेस

मिनी-सीरिज हा प्रकार आपल्याकडे तसा फार चर्चिला जात नाही, पण अमेरिकन टेलिव्हिजनमध्ये त्याला महत्त्वाचं स्थान आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या "एमी' पुरस्कार सोहळ्यातही मिनी-सीरिजचा खास वेगळा विभाग असतो. मिनी-सीरिजमध्ये कथा मर्यादित असते. त्याचे पुढचे सीजन / पर्व येणार नसतात, पण म्हणून ती टेलिफिल्मइतकी लहानही नसते. त्यात काही भाग असतात. हे सगळे भाग एक सलग प्रदर्शित होऊन कथा संपून जाते. पुढच्या पर्वात कथा अजून पुढे चालू राहील असं शक्‍यतो होत नाही.

सिनेमाला वेळेची मर्यादा, तर सीरिजची वेळ वाढवत नेण्याची गरज या दोन्हीचा सुवर्णमध्य मिनी-सीरिज प्रकाराने साधला आहे. त्यामुळे साहित्य पडद्यावर आणताना कथा, कादंबऱ्यांची लांबी बघून त्याप्रमाणे मिनी-सीरिज डिझाईन करणं सोपं जातं. मुख्यतः आधीच्या दोन सिनेप्रकारांसारखं वेळेचं बंधन इथे राहात नाही. त्यामुळे सर्वाधिक साहित्य हे मिनी- सीरिजच्या माध्यमातून पुढे यायला लागलं आहे. शिवाय सीरिसारखं यात अनेक वर्षे बांधून घ्यावं लागत नसल्यामुळे अनेक मोठे स्टार, सिनेमात काम करणारे पण टेलिव्हिजन न करणारे अभिनेते/ अभिनेत्री मिनी-सीरिजमध्ये मात्र आनंदाने काम करू लागले.

आजची मिनी-सीरिजसुद्धा एका साहित्यकृतीवरच आधारित आहे. ती म्हणजे मार्गारेट ऍटवूड या जगप्रसिद्ध लेखिकेची "आलियास ग्रेस' ही कादंबरी. ही मिनी-सीरिज आणि कादंबरी दोन्हीचं वैशिट्य म्हणजे त्या एका ऐतिहासिक घटनेवर आधारित आहेत, पण त्यातील माहिती असलेला इतिहास अगदीच थोडका आहे. आणि त्यावर सगळं काल्पनिक कथानक रचलं आहे. अर्थात हे बऱ्याच वेळा केलं जातं, पण "आलियास ग्रेस'चं वैशिष्ट्य असं की, कादंबरीकाराने काल्पनिक कथानक उभं करताना त्या काळाचे अनेक प्रश्‍न कथेत बेमालूमपणे मिसळले आहेत.

ही कथा आहे ग्रेस मार्क्‍स असं नाव लावणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील एका स्त्रीची. ग्रेस गेली पंधरा वर्षें झाली तिच्या दोन मालकांच्या खुनासाठी जेलमध्ये आहे. तिची शिक्षा भोगून झाली आहे, असं तिच्या जेलरला वाटतं. म्हणून तो एका सायकोलॉजीस्टला तिची परीक्षा घेण्यासाठी बोलावतो. ग्रेस त्याला तिची संपूर्ण कथा सांगते. हे कथन आणि त्याचा डॉक्‍टरवर होणारा परिणाम हा संपूर्ण मिनी-सीरिजची गाभा आहे. इतिहासात ग्रेस मार्क्‍स नावाची व्यक्ती खुनासाठी पकडली गेली होती आणि पंधरा वर्षांनी ती सुटली एवढं माहिती आहे. पण ते खून का केले वगैरे तपशील उपलब्ध नाहीत, पण या कथेत ग्रेसचं युरोपातून कॅनडाला स्थलांतरित होणं, इकडे आल्यावर एक स्त्री म्हणून आणि निम्न वर्गाची सदस्य म्हणून तिचे जे काही हाल होतात त्याची परिणती शेवटच्या खुनात झाली असं आपल्याला दिसतं.

अशाप्रकारे पुरुषांच्या जगात एक स्त्रीबद्दलची मापदंड, त्यांच्या प्रश्‍नांची जाणीव न करून घेताच कशी ठरवली जातात हे आपल्याला हे खून आणि त्यांचं सोडवणं यातून दिसते. उत्कृष्ट अभिनय, काळ उभा करणारी निर्मिती आणि भारावून टाकणारं दिग्दर्शन हे सगळं एकत्र पाहायचं असेल तर संपूर्णपणे स्त्रियांनी उभी केलेली आणि नेटफ्लिक्‍स कॅनडाची पहिली निर्मिती असणारी ही मिनी-सीरिज नक्की पाहा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News