पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तुमचा फोटो लावण्यात येणार आहे... होय बरोबर वाचलं तुम्ही... पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थांचे फोटो त्यासाठी वापरण्यात येणार आहेत. पण हा फोटो कुठे लावणार आणि का हे समजून घ्या... तर तुमचा फोटो लावला जाणार आहे तुमच्या गुणपत्रिकेवर. विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे काही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी.
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर प्रायोगिक तत्वावर काही निवडक अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचा फोटो छापला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्च २०२१ च्या परीक्षेनंतर सर्व विद्यार्थ्यांना अशा गुणपत्रिका मिळू शकेल.
परीक्षा विभागातील सुधारणा करण्याच्या प्रक्रियेत पुणे विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाशी संलग्न १ हजार महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम सत्र पद्धतीनुसारचे आहेत. त्यामुळे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचे नियोजन करणे, वेळापत्रक निश्चित करणे, क्रेडिट पद्धतीनुसार महाविद्यालयाकडून गुण मागविणे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणे ही मोठी प्रक्रिया निरंतर सुरु असते.
पुणे विद्यापीठाच्या 'एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन'ने परीक्षा विभागासाठी पदवी प्रमाणपत्रांच्या डेटा प्रक्रिया व छपाई करिता 'डीग्री डेटा प्रोसेसिंग अँड प्रिंटींग' हे साॅफ्टवेअर विकसीत केले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापराने गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचा फोटो प्रिंट करणे शक्य आहे. त्यासाठी गुणपत्रिकेवर फोटोची जागा निश्चित करणे सॉफ्टवेअरमध्ये त्याचे पॅनल तयार करण्यासाठी अधिकार मंडळाची व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली जाणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, "परीक्षा विभागाने नवे तंत्रज्ञान स्विकारल्याने गुणपत्रकेवर फोटो छापणे शक्य आहे. अधिकार मंडळ व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाईल. आपला फोटो गुणपत्रिका छापला गेल्याने विद्यार्थ्यांनाही त्याच्या समाधान असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे."
परीक्षेचा सुधारणा संदर्भात यूजीसीने २०११ मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते त्यामध्ये गुणपत्रिका व विद्यार्थ्यांचा फोटो छापावा फोटो छापावा विद्यार्थ्यांचा फोटो छापावा असेही नमूद केले होते. कोल्हापूर विद्यापीठात २०१४ पासून गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा फोटो छापला जातो.
हे असतील फायदे
- नाम साधर्म्यामुळे गुणपत्रिकांचा गोंधळ टाळता येईल
- फोटो असल्यामुळे गुणपत्रिका आपली असल्याची विद्यार्थ्यांना खात्री पटणार
- यूजीसीच्या सुरक्षा मानांकनाची अंमलबजावणी
- गुण बदलणे, गुणपत्रिकेवर छेडछाड करणे, नकल करणे हे प्रकार टळतील