आता पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होणार १० सप्टेंबरला

सलील उरुणकर
Friday, 4 September 2020

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहातून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी webcast.unipune.ac.in या लिंकचा वापर करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे

पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवी प्रदान समारंभ आता १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता आॅनलाईन प्रक्षेपित केला जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहातून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी webcast.unipune.ac.in या लिंकचा वापर करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय दुखवट्यामुळे ४ सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाने या कार्यक्रमासाठी १० सप्टेंबर ही दिनांक निश्चित केली असून त्यासाठीचे निमंत्रण विद्यार्थ्यांसह सर्वांना दिले आहे.

विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे या समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. फोर्ब्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह-अध्यक्ष डाॅ. नौशाद फोर्ब्स हे प्रमुख अतिथी या नात्याने स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांनी दिली. कार्यक्रमाला डाॅ करमळकर यांच्यासह प्र-कुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.

विविध विद्याशाखांमधील २०१८-१९ मध्ये आणि तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७ हजार ३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत. सदर पीएच.डी. विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर १५ दिवसांमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

पदवीप्रदान समारंभ कार्यक्रम - सायं ४.३० ते ६.१०

मिरवणुकीला प्रारंभ

राष्ट्रगीत

विद्यापीठ-गीत

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व कुलगुरूंचा अहवाल

पदवीप्रदान समारंभ प्रारंभ

कुलपतींचा उपदेश

प्रमुख पाहुण्यांचे अध्यक्षीय भाषण

पसायदान

मिरवणूक विसर्जन 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News