'ही' आहे पुण्यातील रंगकर्मींची मागणी

संतोष शाळिग्राम
Thursday, 14 February 2019

पुण्याचा विस्तार वाढतोय... उपनगरे फोफावताहेत... रस्त्यांवर वाहनांचा पूर वाहतोय... शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसलेला आहे. अशा वातावरणात सांस्कृतिक चळवळीला श्‍वास घ्यायला जागा कुठे आहे? तुम्ही म्हणाल, मोठी नाट्यगृहे आहेत की. पण ती हौशी आणि प्रायोगिक नाटकांना परवडणारी आहेत का? तर, नाही. मग गरज काय? होय, मोठी हवीतच; परंतु पुण्याच्या विस्तारात आणि नाटकांच्या अर्थकारणातील व्यवहार्यतेसाठी छोटी नाट्यगृहे हीदेखील गरज झालेली आहे.

पुणे : पुण्यात  अनेक रंगकर्मींनी ही सांस्कृतिक गरज अधोरेखित केलेली आहे. दिग्दर्शक प्रसाद वनारसे म्हणाले, ‘‘शहराच्या विविध भागांमध्ये नाटकांसाठी अत्याधुनिक साधनसामग्रीने सज्ज अशा छोट्या जागा निर्माण केल्या पाहिजे. या जागा - सरकारी असो अथवा खासगी- सवलतीच्या दरात वा कमी भाडे आकारणी करून दिल्या पाहिजेत. या जागाच पुढे नाटकांच्या प्रयोगशाळा म्हणून पुढे येतील. त्यासाठी छोटी नाट्यगृहे नक्कीच झाली पाहिजेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची मात्र गरज आहे.’’

दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत म्हणाले, ‘‘नाट्यक्षेत्रात नवे प्रयोग होताहेत. ते प्रवाह एकाच ठिकाणी अनुभवता येणार नाहीत. म्हणून छोटी नाट्यगृहे, रंगमंच ही या काळाची गरज आहे. यामुळे हौशी आणि प्रयोगमूल्य असलेल्या चांगल्या कलाकृतींचा आस्वाद रसिकांना घेता येईल. ‘बालगंधर्व’सारखी मोठी नाट्यगृहे आहेत, त्या पुण्याच्या श्‍वास घेण्याच्या जागा आहेत. त्याही टिकवून ठेवल्या पाहिजेत.’’

मुंबईच्या उपनगरी भागात जशी छोट्या नाट्यगृहांची गरज आहे, तशीच ती पुण्यातही आहे. एखाद्या नाटकाला जाण्यासाठी तास-दोन तास प्रवासात जातात. म्हणूनच विविध भागांमध्ये छोटेखानी सुमारे ३५०-४०० आसनक्षमतेची नाट्यगृहे असावीत. त्यांची संख्या वाढली, की नाटकांची आणि प्रयोगांची संख्या वाढेल. प्रेक्षकांनी नाटकांकडे येण्यापेक्षा नाटक त्यांच्याजवळ गेले, तर प्रेक्षकांची संख्या वाढून अर्थकारणाला गती येईल.

- विजय केंकरे, दिग्दर्शक

व्यावसायिक नाटके म्हणजेच नाट्य चळवळ नाही. हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीदेखील विकसित व्हायला हवी. त्यासाठी शहराच्या विविध भागांत छोटी नाट्यगृहे खूप गरजेची आहेत. यातून नाट्य क्षेत्रातील नवे प्रयोग आणि वेगळे विषय नाटकांद्वारे रसिकांना पाहायला मिळतील, तसेच व्यावसायिक रंगभूमीच्या अर्थकारणालाही त्याचा फायदा होईल. 

- अजित भैरवकर, नाट्यरसिक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News