पुणे हाफ मॅरेथॉन : झुम्बावर थिरकली तरुणाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 December 2019
  • ‘झिंगाट’ गाण्याला तर सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला. जोश आणि टाळ्यांच्या कडकडाटामुळे पहाटेचे वातावरण प्रफुल्लित झाले होते.

पुणे ः पहाटे-पहाटे सुरू असणारी थंड वाऱ्याची झुळूक, सर्वत्र जल्लोष अन्‌ उत्साहाचे वातावरण, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अन्‌ त्यातच मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी वॉर्मअपसाठी सुरू असलेल्या विविध गाण्यांवर युवक-युवती, विद्यार्थी अन्‌ ज्येष्ठही झुम्बा करीत होते. त्यांची पावले विविध गाण्यांच्या तालावर थिरकत होती... ‘शांता बाई’, ‘बेबी डॉल’, ‘बाला बाला’, ‘ढगाला लागली कळ’ अशा गाण्यांच्या ठेक्‍यावर मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांनी मनसोक्त नृत्य केले.

‘झिंगाट’ गाण्याला तर सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला. जोश आणि टाळ्यांच्या कडकडाटामुळे पहाटेचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. झुम्बा डान्सर समीर सचदेवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तसेच, स्वतः नृत्य करीत प्रोत्साहनही दिले.

समीर म्हणाला, ‘‘कोणत्याही खेळाच्या आधी वॉर्मअप करावा लागतो. त्यात आजच्या या स्पर्धेत भाग घेणारे सर्वजण झुम्बाला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून खरोखरच आनंद होत आहे.’’ या वेळी समीरने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून त्याने केलेल्या विनोदांवर स्पर्धक खळखळून हसतही होते. स्पर्धक अनघा गाडवे म्हणाल्या, ‘‘मॅरेथॉनच्या सुरुवातीस वार्मअपसाठी झुम्बा ही अतिशय उत्तम कल्पना आहे. झुम्बा केल्यामुळे आमचा उत्साह आणखी वाढला असून, या स्पर्धेत सहभाग घेतल्याचा आनंद होतोय.’’

मॅरेथॉन संपल्यानंतर स्पर्धकांसाठी खास योगाचे आयोजन केले होते. योग प्रशिक्षक अंशुका परवानी हिने सर्वांनाच योगाबाबत मार्गदर्शन करीत विविध आसने शिकविली. धावल्यानंतर शरीराची कशी आणि काय काळजी घ्यावी? हे तिने स्पर्धकांना सांगितले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News