गरीब विदयार्थांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट व स्मार्टफोन मोफत द्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • कोविड १९ मुळे मार्च पासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत.
  • त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मग सरकारने या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा पर्यायी मार्ग काढला आहे.

गोंदिया :- कोविड १९ मुळे मार्च पासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मग सरकारने या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा पर्यायी मार्ग काढला आहे. ज्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा त्या मागचा हेतू आहे. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थांचे शिक्षण धोक्यात आले आहे. म्हणूनच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासनाने मोफत मोबाईल आणि इंटरनेट सेवा देण्याची मागणी संविधान मैत्री संघ व सोबती संघटना आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र, समता सैनिक दल व सर्वसमाज जयंती समिती यांनी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या नावाने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सरकारचा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास शहरी, ग्रामीण व आदिवासी भागातील गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी राज्यातील शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था मार्च महिन्यापासून बंद आहेत. परंतु,  आता वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरु करण्याच्या तयारीत आहे. पण, सद्यपरिस्थितीचा विचार करता टाळेबंदीमुळे गरिबांच्या हाताला काम नाही.  आर्थिक चक्र पूर्णपणे थांबलेले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब वीज बिल भरू न शकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्रामीण दुर्गम भाग शासनाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने राज्यातील हजारो गाव-पाड्यांत आजही मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन यासारखी आधुनिक साधने कुठून येणार? असा सवाल अतुल सतदेवे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागात वीज जोडणी करुन नियमित वीज पुरवठा करावा,  प्रत्येक गाव-पाड्यांत मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड मोबाईल द्यावेत. यासाठी लागणारा इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत उपलब्ध करून द्यावा. ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्यापूर्वी सर्व शिक्षकांना त्याबाबतचे तांत्रिक शिक्षण द्यावे. जेणे करून विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षित करू शकतील आदी मागण्यांचा समावेश होता.शिष्टमंडळात सतदेवे, आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्रतर्फे संचालक महेंद्र कठाने आणि विद्यार्थी सीमॉन भालाधरे, यश देशभ्रतार,  श्रावणी पानतावने,  आदित्य कठाने,  नंदिनी बन्सोड, सर्वसमाज जयंती समितीचे पुरुषोत्तम मोदी व समता सैनिक दलतर्फे राजहंस चौरे यांचा समावेश होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News