प्रतिबंधात्मक औषधी अन् डोपिंग, फिटनेस, सूर्यनमस्कार..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020
  • क्रीडा जगतातील दिग्गजांशी देवेंद्र फडणवीस यांचा संवाद
  • ​अंजली भागवत, कविता राऊत यांच्यासह अनेकांचा सहभाग

मुंबई : कोरोनानंतरच्या काळात प्रत्येक क्षेत्रात कोणकोणत्या समस्या असतील आणि त्याला तोंड देण्यासाठी काय उपाय योजावे लागतील, यावर अतिशय सखोल मंथनाच्या मालिकेत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी संवाद साधला. प्रतिबंधात्मक औषधी घेतल्याने डोपिंग चाचणीच्या भीतीपासून ते घरातील फिटनेसपर्यंत अनेक बाबींचा उलगडा या संवादातून झाला.

अंजली भागवत आणि कविता राऊत यांनी या चर्चेत भाग घेताना क्रीडापटूंना आवश्यक अशा सर्वच घटकांसाठी सर्वंकष असे शिबिरं आयोजित करण्याची सूचना केली, ज्यात फिजिओ, न्यूट्रीशन, समुपदेशन अशा आवश्यक सर्व बाबींचा अंतर्भाव असेल. क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा, वैयक्तिक क्रीडा प्रकाराकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज, सर्वच स्पर्धा लांबल्या असल्याने वयोमर्यादेची अट यावर्षी शिथिल करण्याची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी व्यापक मंथन झाले. 2024 च्या ऑलिम्पिकची तयारी, समूह प्रशिक्षण, सामूहिक पीटीच्या जुन्या पद्धतींकडे वळण्याची गरज आणि अ‍ॅथलिट्ससाठी समूह अल्पावधींचे अभ्यासक्रम, बाहेरच्या विश्वात वावरणार्‍यांना अचानक घरी रहावे लागत असल्याने फिटनेनसकडे लक्ष देण्याची अत्याधिक गरज, ध्यानधारणा आणि योग, आहारविहार, ऑक्टोबरपासूनच्या राष्ट्रीय स्पर्धांच्या तयारींसाठी करावे लागणारे नियोजन, अ‍ॅथीलिटसाठी व्हीडिओ सेशन्स, रोगप्रतिकार शक्ती राखण्यासाठी करावे लागणारे उपाय, ग्रामीण आणि शहरी भागात राहणार्‍या क्रीडापटूंसाठी कराव्या लागणार्‍या वेगवेगळ्या उपाययोजना, सूर्यनमस्काराचे महत्त्व, प्रतिबंधात्मक औषधी आणि डोपिंगबाबत असलेल्या शंका अशा कितीतरी विषयांवर यावेळी मनमोकळी चर्चा झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडे असलेल्या त्या-त्या विषयांसंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अभ्यासाच्या तासिका पूर्ण करण्यासाठी खेळाच्या तासिका कमी करणे, त्यातून क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष होणे, क्रीडा क्षेत्राच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होणे, असे काहीही आपण होऊ देणार नाही, असेही आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

वर्षा उपाध्याय, विजेंद्र सिंग, आशीष पेंडसे, निकिता राऊत, प्रदीप गंधे, शैलजा जैन, नामदेव शिरगावकर, मधुरिमा राजे छत्रपती, निलेश कुळकर्णी, राजा चौधरी, माधुरी वैद्य, वैदेही वैद्य, मंगेश काशीकर, अ‍ॅडिल सुमारीवाला, अरूण खोडसकर, मंदार तम्हाणे, अयोनिका पॉल, विनायक तुजारे, अभिजित कुंटे, जय कोवली, तेजस्विनी सावंत, श्रीपाद ढेकणे आणि इतर अनेक मान्यवर या संवादात सहभागी झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News