'या' विद्यार्थांसाठी ऑक्टोबरपासून दूरदर्शनवर कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 29 September 2020
  • कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय मार्चपासून बंद आहेत.
  • परंतु मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून सरकराने शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला होता.

पुणे :- कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय मार्चपासून बंद आहेत. परंतु मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून सरकराने शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला होता. राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. विद्या प्राधिकरणातर्फे  ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम होणार आहे.

यंदा करोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. परिणामी शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी लागत आहे. १५ जूनपासून शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवत आहेत, तर संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी शिक्षक गावांत जाऊन विद्यार्थ्यांच्या गटांना शिकवत आहेत.

ऑनलाइन शिक्षणासाठीच्या साधनसुविधांची मर्यादा लक्षात घेऊन एकाच वेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरदर्शनचा वापर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मे महिन्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दूरदर्शनवर वेळ मिळण्यासाठी पत्र ही लिहिले होते. पण त्यावेळी दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू झाले नाहीत.

दरम्यान, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ हा कार्यक्रम सुरू केला. परंतु नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता. त्यामुळे आता पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात ऑक्टोबरपासून दूरदर्शनवर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होत आहे.

विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, की नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी दूरदर्शनकडून ऑक्टोबरपासून वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रसारणाची वेळ वगैरे तपशील स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. शैक्षणिक कार्यक्रमांचे काही भाग तयार करण्यात आले आहेत. तसेच पुढील भागांसाठीचे चित्रीकरण ही सुरू आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम

दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम सुरू करण्यात येतील. त्यानंतर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News