सहभागी खो-खो संघांची बक्षिसांची रक्कम संघाच्या बॅंक खात्यात जमा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

पुण्याच्या नव महाराष्ट्र खो-खो संघाने हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले होते.

मुंबई: पुण्याच्या नव महाराष्ट्र खो-खो संघाने हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले होते. कोरोना महामारीच्या आक्रमणामुळे ही स्पर्धा होणार नाही; पण त्यांनी या स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या संघांना रोख पारितोषिक देण्याचे ठरवले. एवढेच नव्हे, तर ही बक्षिसांची रक्कम संघाच्या बॅंक खात्यात जमाही केली आहे.
विम्बल्डन टेनिस संयोजकांनी रद्द झालेल्या स्पर्धेबाबत सर्व पात्र सहभागी खेळाडूंना रक्कम देण्याचे ठरवले आहे. नव महाराष्ट्र संघानेही काहीसा हाच निर्णय घेतला आहे; पण नव महाराष्ट्राचे पाऊल विम्बल्डनच्या पुढचे आहे. विम्बल्डन संयोजकांना स्पर्धा कोरोना महामारीमुळे रद्द झाल्याबद्दल भरघोस विमा रक्कम मिळणार आहे. त्यातूनच संयोजकांनी खेळाडूंनी बक्षीस रक्कम देण्याचे ठरवले आहे. नव महाराष्ट्र संघाने स्पर्धा घेताना त्यासाठीची रक्कम उभारली होती. प्रसंगी या संघावर प्रेम करणाऱ्यांनी स्पर्धेसाठी मदत केली आहे. त्यामुळे संघाला कोणतेही उत्पन्न मिळणार नसतानाही नव महाराष्ट्र संघाने उचललेले पाऊल नक्कीच जास्त स्वागतार्ह आहे.

पुण्याच्या या संघाने देशातीलच नव्हे, तर जगभरातील क्रीडा संयोजकांसाठी जणू आदर्श घालून दिला आहे. खेळाच्या प्रचार तसेच प्रसारासाठी खासगी संस्थांचा सहभाग आवश्‍यक आहे. कोरोनामुळे स्पर्धा होणार नाही, सहभागी संघांना बक्षीस रक्कम देण्याचा विचार मनात आल्यावर तो निर्णय नव महाराष्ट्र मंडळाने दोन दिवसांत पूर्णपणे अंमलातही आणला, असे मंडळाचे कार्यवाह श्रीरंग इनामदार यांनी सांगितले. त्यांनी आम्ही एकंदर 2 लाख 40 हजार दिले असल्याचे सांगितले.

नव महाराष्ट्राने खो-खो स्पर्धा घेताना केवळ खासगी संघांना निमंत्रित करण्याचे ठरवले आहे. खो-खोच्या प्रचार तसेच प्रसारासाठी हा निर्णय घेतला. त्यांची यापूर्वीची स्पर्धा 2015 मध्ये झाली होती. या वर्षी हीरकमहोत्सवानिमित्त स्पर्धा होणार होती. त्याची तयारी सुरू झाली होती. या स्पर्धेत गेल्या चार वर्षातील कामगिरीनुसार सर्वोत्तम आठ पुरुष आणि आठ महिला संघांना निमंत्रित केले जाते. त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना एकंदर दोन लाखाचे रोख बक्षीस देण्यात येते. आता यंदा त्यांच्या यापूर्वीच्या कामगिरीनुसार पुरुष आणि महिला विभागातील सर्वोत्तम चार संघांची निवड केली आणि त्यांना प्रत्येकी पंधरा हजार दिले. त्याच वेळी दोन्ही विभागातील अन्य चार संघांना प्रत्येकी दहा हजार दिले आहेत. त्याचबरोबर स्पर्धेसाठी मंजुरी देत असलेल्या पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य संघटना तसेच भारतीय महासंघास प्रत्येकी दहा हजार दिले आहेत. याचबरोबर नव महाराष्ट्र संघासाठी मार्गदर्शक तसेच सल्लागार असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळी (पुणे) यांनाही दहा हजाराचा निधी देण्यात आला आहे.

चार ते पाच वर्षांनी स्पर्धा घेत असतो. हीरकमहोत्सवी वर्षात स्पर्धा घेणारच होतो. त्याची तयारी सुरू केली होती. आता स्पर्धा न होताही संघांना साह्य करता येते, हे आम्ही दाखवून दिले आहे. भारतीय खेळातील एक खासगी क्‍लब आपल्या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना साह्य करू शकतो, हा विचार आम्ही केला आणि तो अंमलात आणला आहे.
- श्रीरंग इनामदार, कार्यवाह नव महाराष्ट्र संघ

बक्षीस विजेते संघ
पुरुष, प्रत्येकी 15 हजार ः नव महाराष्ट्र संघ, जयहिंद मंडळ (इचलकरंजी), शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्टस्‌ अकादमी, हिंदकेसरी स्पोर्टस्‌ कवठेपिराण. प्रत्येकी 10 हजार ः विहंग क्रीडा मंडळ (ऐरोली), ग्रिफिन जिमखाना, यंग पायोनिअर्स स्पोर्टस्‌ क्‍लब, सरस्वती स्पोर्टस्‌ क्‍लब.
महिला, प्रत्येकी 15 हजार ः रा. फ. नाईक विद्यालय, शिवभक्त क्रीडा मंडळ, छत्रपती व्यायाम प्रसार मंडळ (उस्मानाबाद), आर्यन स्पोर्टस्‌ क्‍लब. प्रत्येकी 10 हजार ः कावेरी कपिला स्पोर्टस्‌ क्‍लब, केरळ खो-खो क्‍लब, सिलिगुरी महाकुमा खो-खो संघटना, नरसिंह क्रीडा मंडळ (रांजणी).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News