एकांत...

 ज्ञानेश्वर गुंजाळ
Friday, 30 August 2019
  • आत्ताही डोळे मिटले की तो अनमोल नजारा डोळ्यासमोर उभा ठाकतो.. आभासी का असेना !

मध्यान्हाच्या काळात, रणरणत्या उन्हात, चंद्रभागेच्या वाळवंटाप्रमाणे भटक्यांच्या पंढरीतील कड्यावरील कातळ तापला होता, ऊन मी म्हणत होतं आणि समोर चंद्रभागेच्या शीतल उदकाप्रमाणे डोळ्यांना गारवा देणारं कोकणकड्यावरलं दृश्य होतं.

सकाळी, याची देही याची डोळा इंद्रवज्र बघून डोळ्याचं असं पारणं फिटलं होतं; जणू पांडुरंगाच्या मुकुटामागील तेजोवलयच ढगांत स्थिरावलं आहे!  कड्यावर इंद्रवज्र बघणाऱ्यांची लगबग आता शमली होती. सर्वांनी काढता पाय घेऊन कुठेतरी पहुडण्यासाठी जागा शोधली होती.

माझ्या मनाला मात्र कड्यावरील नीरव शांततेने भुरळ घातली होती. सृष्टीच्या लालित्याच्या मोहात पडलो होतो किंबहुना संमोहीतच झालो होतो. अफाट मनःशांती लाभत होती; उतू जात होती. कड्यावर एकटा मी होतो अन विचारचक्रांनी विश्रांती घेतली होती.

तप न करता सिद्धी प्राप्त झाल्याची अनुभूती होत होती, ब्रह्मांडातून विलक्षण मोठा ऊर्जेचा झोत येऊन अंगात संचार करीत होता. काळ थांबल्यागत झाला होता.कोकणावरून आलेली थंड वाऱ्याची झुळूक रविराजाच्या तप्त लीलेला जणू शह देऊन क्षणोक्षणी सुखद अनुभूती करून देत होती.

अगदी स्वप्नवत होतं सगळं... आत्ताही डोळे मिटले की तो अनमोल नजारा डोळ्यासमोर उभा ठाकतो.. आभासी का असेना ! कोकणकडा हे हरिशचंद्रगडावरील नुसते ठिकाण नसून एक भावना आहे हे मलातरी सिद्ध झालं... जेथे निसर्गदेवतेच्या सोबतीत एकटेपणासुद्धा हवाहवासा वाटतो !

एक बाकी एकाकी, एक अंत एकांत..
एक अडके एकात, एक एकटया जगात !

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News