‘निर्भया मॅरेथॉन’ला राहणार दिग्गजांची उपस्थिती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

रिंकू राजगुरू या निर्भया मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असणार आहेत. तर, यानिमित्ताने होणाऱ्या टॉक शोमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, खासदार सुप्रिया सुळे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

नाशिक : महिला सबलीकरणाच्या उद्देशाने नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे जागतिक महिलादिनी (ता. ८) ‘निर्भया मॅरेथॉन’ होत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ‘सैराट’फेम ‘आर्ची’ रिंकू राजगुरू या निर्भया मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असणार आहेत. तर, यानिमित्ताने होणाऱ्या टॉक शोमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, खासदार सुप्रिया सुळे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी सुरू आहे. आतापर्यंत साडेतीन हजार धावपटूंनी नाव नोंदविले आहे. याचनिमित्ताने सोमवारी (ता. २४) आयुक्तालयात आयुक्त नांगरे-पाटील यांनी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, ‘देशदूत’च्या संपादक वैशाली बालाजीवाले, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, ‘यूएनआय’चे रत्नाकर शिंपी, ‘भ्रमर’चे चंदुलाल शाह यांच्याशी संवाद साधला. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, मॅरेथॉन समिती सदस्य डॉ. शैलेंद्र गायकवाड, राहुल रायकर उपस्थित होते. या वेळी पोलिस आयुक्तांनी मॅरेथॉनच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. ‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी’ असे मॅरेथॉनचे घोषवाक्‍य आहे. ३, ५, १० आणि २१ किलोमीटर अंतराच्या गटांत ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेस पहाटे पाचपासून प्रारंभ होऊन टप्प्याटप्प्याने पुढील गटनिहाय स्पर्धांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे आणि ठक्कर डोम येथे विशेष टॉक शो होणार असल्याचे श्री. नांगरे-पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी पुरुषांसाठी निळा, तर महिलांसाठी गुलाबी रंगाचा टी-शर्ट, विशेष किटमध्ये महिला सुरक्षिततेसंदर्भातील पुस्तिकाही दिली जाणार आहे. या वेळी उपस्थित संपादकांनीही काही सूचना केल्या. या सूचनाही अमलात आणण्यात येतील, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

अक्षयकुमार, कॅटरिनाची पोलिस स्पर्धेत हजेरी दरम्यान, त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये येत्या २३ ते २५ मार्चदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. यासाठी अभिनेता अक्षयकुमार, अभिनेत्री कॅटरिना कैफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी येणार आहेत. अक्षयकुमार या वेळी साहसी प्रात्यक्षिक करून दाखविणार असल्याचेही श्री. नांगरे-पाटील यांनी या वेळी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News