विद्यार्थ्यांनी अमेरिकेला राहण्यापूर्वी अशी करा पूर्वतयारी

दिलीप ओक, परदेशी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक
Wednesday, 5 June 2019

विद्यापीठांच्या आवारात कॉम्प्लेक्‍स असतात, परंतु ती महाग असतात. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी विद्यापीठांच्या जवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात.

अमेरिकेत जाण्यापूर्वी नियमित वैद्यकीय चाचण्या करून घेणे चांगले. काही आजार असल्यास येथेच उपचार करून घेता येतात. विशेषतः दातांची पूर्ण तपासणी करणे आवश्‍यक आहे. कारण, अमेरिकेत दातांवरील उपचार हे अतिशय महाग आहेत. शिवाय त्याचा विमाही खूपच महाग असतो. क्षयरोगाची चाचणी करून घेणेही फायदेशीर असते. आणि तसे निदान झाल्यास भारतातच त्यावर औषधोपचार करून घेणे गरजेचे असते. जाताना शक्‍यतो सर्दी, ताप, खोकला, पोट बिघडणे यांसारख्या आजारांवरील औषधे भारतातूनच घेऊन जावीत. म्हणजे तेथील डॉक्‍टरकडे वारंवार जाण्याची वेळ येणार नाही. 

स्वयंपाक करण्याची तयारी : विद्यापीठातील ५ ते ६ विद्यार्थी एकत्र येऊन एखादी सदनिका भाड्याने घेतात. त्यासर्वांना आळी-पाळीने स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे जाण्यापूर्वी व्यवस्थित स्वयंपाक करायला शिकावा. बाहेरचे जेवण अथवा न्याहारी अतिशय महाग पडते. हल्ली जवळजवळ सर्वच अमेरिकन शहरात भारतीय वस्तू मिळण्याची दुकाने आहेत. त्यामुळे शाकाहारी लोकांनासुद्धा हल्ली अमेरिकेत जेवणाची समस्या येत नाही.

राहण्याची व्यवस्था : विद्यापीठांच्या आवारात कॉम्प्लेक्‍स असतात, परंतु ती महाग असतात. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी विद्यापीठांच्या जवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात. ही अपार्टमेंट अनेकदा फक्त विद्यार्थ्यांसाठीच बांधलेली असतात. आणि स्वस्तही असतात. इंटरनेटवर याची पूर्ण माहिती असते. 

सदनिका घेताना पुढील महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी :
करार किती दिवसांसाठी आहे आणि तो अगोदर मोडल्यास दंड किती पडतो?
हिटर आणि कुलर चालतो का?  कीटकनियंत्रण झाले आहे का?
पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का?  त्या भागातील गुन्ह्याचा दर किती आहे?

विमानाचे तिकीट  : व्हिसा मिळाल्यावर लगेचच विमानाचे तिकीट काढावे. कारण, जुलै-ऑगस्टमध्ये तिकिटे खूपच महाग होतात. तसेच शक्‍यतो कमी वेळात आणि दिवसा उजेडी पोचणारी विमानसेवा घ्यावी. अमेरिकेचा प्रवास खूप लांबचा आणि दमणूक होणारा असतो.

मोटार चालवण्याचा परवाना : अमेरिकेत सार्वजनिक वाहनव्यवस्था फारच थोड्या शहरात असते. शिवाय तेथे दोन ठिकाणांतील अंतरही फार असतात. त्यामुळे स्वतःची मोटार असणे फारच गरजेचे असते. अमेरिकेतील ड्रायव्हिंग स्कूल फारच महाग असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी भारतात उत्तम ड्रायव्हिंग शिकून घेणे गरजेचे आहे. हल्ली भारतीय स्मार्टकार्ड ड्रायव्हिंग परवाना हा अमेरिकेतील बऱ्याच राज्यांत एक वर्षांसाठी चालतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News