लग्नसोहळ्यात 'राजेशाही' पेहरावाला पसंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

जुने ते सोने या म्हणीनुसार पूर्वीची फॅशन नव्याने मूळ धरू लागली आहे. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये जुन्या फॅशनचे थोडे हटके रूप पाहायला मिळते. मराठमोळे लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे. इतके की पंजाबी, गुजराती लग्नांमध्येही आता थोडे हटके पेहराव असावा. या उद्देशाने नऊवारी किंवा सहावारी पैठणीसह लेस, शिफॉन, नेटच्या साड्यांना पसंती दिली जात आहे. 

नवी मुंबई : गेल्या वर्षभरात राजेशाही पेहरावात लग्न करण्यास पसंती वाढली आहे. केवळ नवरा-नवरीच नाही तर वधू-वरांचे संपूर्ण कुटुंबच लग्न समारंभात राजेशाही पेहराव परिधान करण्यास पसंती देत आहेत. विशेष म्हणजे यामध्येही ‘पानिपत’, ‘पद्मावत’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची; तर ‘स्वामिनी’, ‘संभाजी’सारख्या मालिकांची संकल्पना लक्षात घेऊन त्यातील कलाकारांप्रमाणेच वस्त्र, अलंकार, आभूषणे घालण्याचा कल वाढत आहे. 

लग्न म्हटले की मुलींसाठी नटण्या, मुरडण्याची पर्वणीच. त्यात आता मुलेही मागे राहिलेली नाहीत. पूर्वी लग्न म्हटले की नवरा-नवरीच्याच पोषाखावर अधिक खर्च केला जायचा. आता मात्र, हे चित्र बदलत असून लग्नसराईत नवरा-नवरीबरोबरच वधू-वरमाय, वडील व बहीण भावंडांसह कुटुंबातील सारीच मंडळी एखादी थीम घेऊन त्यानुसार पेहराव करताना आढळतात. सध्या ऐतिहासिक चित्रपटांत दाखवलेल्या ‘फॅशन’ अर्थात चालीरितींचे अनुकरण करताना वधू-वर मंडळी व त्यांचे कुटुंब दिसत आहेत. ‘पानिपत’, ‘पद्मावत’, ‘तानाजी’ अशा चित्रपटांतील, तसेच ‘संभाजी’, ‘स्वामिनी’ या मराठी मालिकांमध्ये दाखवण्यात येत असलेल्या सिल्कच्या नऊवारी साड्या, तसेच दागिन्यांची मागणी वाढत आहे.

दागिन्यांमध्ये कर्णफुले, चौसरा, चाफेकळी माळ, गाठले, चिंचपेटी, मणदोरा (कमरपट्टा), तळेबंध, जवे असे विविध प्रकार पाहण्यास मिळतात. बांगड्यांची जागा कड्याने किंवा रिंग जोडलेल्या ब्रेसलेटने घेतलेली दिसते. पुरुषांकरता एसीमेट्रिक कट, एम्ब्रॉयडरड शेरवानी, पेन्सिल फिट ट्राउजर, खांद्यावरची मफलर, फेटा, मोजडी असा पेहराव असतो. केवळ वधू-वरच नाही, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पेहरावाची एकच संकल्पना आत्मसात केलेली दिसते.

लग्नसोहळा नेहमीच थाटात आणि चारचौघांच्या लक्षात राहील, असा करण्याकडे कल असतो. त्यामुळे थीम वेडिंग जास्त होत आहेत. वधू-वराच्या पेहरावाबरोबरच आता आई, वडील, भाऊ-बहिणी, काका, मामा अशी जवळची लोकं थीमनुसारच कपडे परिधान करताना दिसतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News