प्रशांत किशोरवर माहिती चोरल्याचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

प्रशांत किशोर यांनी अभियान ‘बात बिहार की’साठी आपल्या मजकुराची चोरी केल्याचा आरोप मोतिहारी येथील शाश्‍वत गौतम यांनी केला

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंड पुकारणारे रणनीतिकार प्रशांत किशोर ऊर्फ ‘पी. के.’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाटण्याच्या पाटलीपुत्र पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. प्रशांत किशोर यांनी अभियान ‘बात बिहार की’साठी आपल्या मजकुराची चोरी केल्याचा आरोप मोतिहारी येथील शाश्‍वत गौतम यांनी केला असून, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ओसामा नावाच्या व्यक्तीचेही एफआयआरमध्ये नाव आहे. ओसामा याने पाटणा विद्यापीठात विद्यार्थी सरचिटणीसपदाची निवडणूक लढविली होती, तर शाश्‍वत हा काँग्रेसचा पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता आहे.

शाश्‍वत गौतम यांनी बिहार की बात नावाचा प्रोजेक्ट तयार केला होता. हा प्रोजेक्ट आगामी काळात ते लाँच करणार होते. यादरम्यान या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या ओसामा नावाच्या युवकाने राजीनामा दिला. याच ओसामाने बिहार की बातचा कंटेट प्रशांत किशोर यांच्या हवाली केला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो संपूर्ण मजकूर आपल्या संकेतस्थळावर अपलोड केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलिस तपासाला लागले आहेत. कलम ४२०, ४०६ नुसार तक्रार दाखल झाली असून, पोलिस अनेक कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. शाश्‍वत गौतम हे बिहारच्या पूर्व चंपारणच्या चैता गावचे रहिवासी आहेत, ते इंजिनिअर असून अनेक दिवस ते अमेरिकेत होते. २०११ मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने शाश्‍वत गौतम यांची ग्लोबल लीडर फेलोसाठी निवड केली, तेथे त्यांनी एमबीए केले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News