प्रकाश कामतीकर: एका अवलियाच्या सहवासात..!

डॉ. मारोती कसाब, उदगीर
Wednesday, 9 October 2019

सरांचं व्यक्तिमत्त्वही मोठं लोभसवाणं... भरपूर उंची... शक्यतो एकाच रंगाची हाफ सफारी ते परिधान करीत. दाढी कायम वाढलेली. तोंडात पानाचा तोबरा भरलेला... ओठ कायम लालचुटूक... डोळ्यांना चष्मा लावलेला... त्यातूनही एका डोळ्यात पडलेली टीक स्पष्ट दिसत असलेली. 

१९८९ साली मी मॅट्रिक पास झालो आणि अकरावी विज्ञान या वर्गात सेलूच्या नूतन महाविद्यालयात प्रवेश घेतला. न्यू हायस्कूल सारख्या खेडवळ वातावरण लाभलेल्या शाळेत माझं सहावी ते दहावी शिक्षण झालेलं. 'दुधविक्या ते शाळाशिक्या' असा प्रवास झालेला. 

नूतन महाविद्यालय म्हणजे स्वर्गच वाटायचे मला. उंचवट्यावर उभारलेली इ आकाराची पांढराशुभ्र इमारत, भोवताली सदाबहार झाडी, स्वतंत्र बोटॅनिकल गार्डन, झाडांच्या भोवती बसण्यासाठी बांधलेले कठडे या कॉलेज कट्ट्यावर बसून आम्ही चळवळीच्या बाता मारायचो. असं हे सगळं.
 
सेलूचे पहिले नगराध्यक्ष श्रीरामजी भांगडिया, स्वामी रामानंद तीर्थ, अंबाजोगाईचे परांजपे गुरुजी आदींची कर्मभूमी. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांच्या आदरयुक्त धाकात आम्ही वाढत होतो. 

माझ्या गावातील मित्र शाहीर के. आर. बुरखुंडे हे माझे सिनिअर. ते बीएला शिकत असल्याने त्यांच्याकडून मी वाचायला पुस्तके घेत असे. तेव्हापासून मला लेखकांबद्दल आकर्षण वाटू लागले. अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीमुळे वाचनाची गोडी लागली. मु. पो. देवाचे गोठणे, अबोल झाली सतार, बळी इ. अनेक पुस्तके त्या काळात वाचली. ज्या महाविद्यालयात आपण प्रवेश घेतला आहे, तिथेही काही लेखक असल्याची माहिती मिळाली. विश्वास वसेकर, प्रकाश कामतीकर, यादव गायकवाड ही प्राध्यापक मंडळी आणि गौतम सूर्यवंशी हे लिपिक लेखक म्हणून मला परिचित झाले. या सर्वांचे साहित्य मिळवून वाचत होतो. मराठीतील दिग्गज लेखकांच्या हाताखाली शिकता येईल म्हणून मी बारावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. तोपर्यंत प्रकाश कामतीकर यांना मी फक्त ओळखत होतो. 

सरांच्या वर्गात बसायला मिळणे म्हणजे फार भारी अनुभव असेल असे वाटायचे अन् ते खरेच ठरले. सरांचे वक्तृत्व म्हणजे अखंड कोसळणारा धबधबाच जणू..! पुस्तक राहिलं बाजुला; सर बोलायला लागले की एकेका विषयावर कितीतरी वेळ बोलतच राहायचे. एखादा अवलिया, कलावंत कसा असतो तर प्रकाश कामतीकर सरांसारखा..!
   
सेलूच्या विद्यानगर भागात रस्त्याच्या कडेलाच "मनाली" नावाचं झाडांनी वेढलेलं छोटंसं पण अत्यंत आखीव रेखीव असं, टुमदार घर होतं कामतीकर सरांचं..! महाविद्यालयात जाता येता आम्ही मुद्दाम घरासमोर थबकत दारातून आत पहायचो. घरात असंख्य चित्र लावलेली दिसत... पुस्तकांचे कपाट दिसे... घरात मुक्तपणे वावरणाऱ्या सरांच्या अर्धांगिनी दिसत. सरांना दोनच मुलं. प्रणव आणि अनुज अशी त्यांची बहुधा नावं असावीत... आम्हाला त्या नावांचंही अप्रुप वाटायचं. सरांचं व्यक्तिमत्त्वही मोठं लोभसवाणं... भरपूर उंची... शक्यतो एकाच रंगाची हाफ सफारी ते परिधान करीत. दाढी कायम वाढलेली. तोंडात पानाचा तोबरा भरलेला... ओठ कायम लालचुटूक... डोळ्यांना चष्मा लावलेला... त्यातूनही एका डोळ्यात पडलेली टीक स्पष्ट दिसत असलेली. 

आवाजाला बारीक धार असलेली. एरवी कमीच बोलत पण, तंद्री लागली की न थकता बोलत असत सर. त्यांच्या वर्गात बसलं की, जगाची सफर झाली म्हणून समजा. त्या काळात आम्हाला संगणक, इंटरनेट, विविध टीव्ही वाहिन्यांची माहिती सरांमुळे झाली. जागतिक दर्जाच्या साहित्याची आणि साहित्यिकांची, पत्रकारांची आणि चित्रकारांची माहिती सर देत असत. कारण ते स्वतःच एक उत्कृष्ट लेखक, पत्रकार आणि चित्रकार होते. पं. या. तरफदार आणि भाऊ समर्थ हे त्यांचे आवडते चित्रकार होते. 
  
जालना हे त्यांचं गाव. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनही शाखांमध्ये त्यांचे शिक्षण झालेले. सुरुवातीला काही काळ त्यांनी अनियतकालिकेही चालवली. स्वतः हाताने लिहून ते अनियतकालिक प्रकाशित करत असत. एकदा सरांनी घरी नेऊन आम्हाला अनियतकालिकांचे जुने अंक दाखविले होते. तेव्हा ताईंनी आम्हाला पाजवलेला चहा आजही स्मरणात आहे. सर उंच तर ताई त्यांच्यापुढे अगदीच ठेंगण्या. पण ही जोडी फारच छान दिसायची. फार आनंदात होतं हे कुटुंब... घर असावं तर असं, असं खूप वाटायचं..!
   
पदवीची तीन वर्षे गायकवाड सर आणि कामतीकर सरांच्या सहवासात कधी निघून गेली ते कळलंच नाही. कामतीकर सरांनी शिकवलेलं साहित्यशास्त्र आणि गायकवाड सरांनी शिकवलेलं भाषाशास्त्र मुखपाठ झालं. महदंबेचे धवळे शिकवताना तर फारच तल्लीन होत कामतीकर सर..! ना. धों. महानोर यांची  "गांधारी" सरांनी आपल्या खास शैलीत शिकवली. कुसुमाग्रजांची कविता, अनुराधा पाटलांची कविता हे सारं सारं कालच कामतीकर सरांनी शिकवलंय असं वाटतंय... लोकमत मध्ये वर्षभर "रंग अनंग" हे सदर सरांनी लिहिलं. शब्दगंधा, शब्दुली, रंग अनंग, विकार विलसिते ही सरांची पुस्तकं त्यांच्यातल्या मनस्वी कलावंताची ओळख करून देतात. 

सेवानिवृत्तीनंतर सरांनी सेलू सोडली. ते आता पुण्यात स्थाईक झालेत... फेसबुकवरची त्यांची भेट जगायला बळ देऊन जाते... खरोखरच एका मनस्वी लेखक, चित्रकार आणि उत्तम शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले म्हणूनच थोडेफार आपण घडू शकलो ही जाणीव सरांबद्दलची कृतज्ञता वाढवते... आज सरांचा सत्त्याहत्तरावा वाढदिवस... सरांना आरोग्यदायी दीर्घायु लाभो, हीच निर्मिकाचरणी प्रार्थना... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सर..!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News