देशात भाजपा आलं, मात्र या राज्यात विस्ताराचाही पत्ता नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात आठ नवे चेहरे

  • होय... नितीश भाजपवर नाराजच​

पाटणा - केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संयुक्त जनता दलास (जेडीयू) योग्य स्थान न मिळाल्याने संतापलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला जशास तसे उत्तर देत रविवारी आपल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळाच्या या ताज्या विस्तारामध्ये ‘जेडीयू’च्या आठ नव्या मंत्र्यांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र या विस्तारात भाजप तसेच लोक जनशक्ती पक्षाच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेले नाही.

राजभवनात राज्यपाल लालजी टंडन यांनी या सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जातीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवूनच या खेपेस खातेवाटप करण्यात आले. संजय झा, नीरज कुमार, श्‍याम रजक, बिमा भारती, अशोक चौधरी, नरेंद्र नारायण यादव, लक्ष्मेश्‍वर राय आणि रामसेवक सिंह अशी या मंत्र्यांची नावे आहेत.  मंजू वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नव्हती. बिमा भारती यांच्या समावेशामुळे आता या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळाले आहे. या विस्तारामुळे मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ३३ वर पोचली आहे. या विस्तारानंतर खातेवाटपही करण्यात आले. त्यात काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फरबदल करण्यात आले आहेत.

या वेळी माध्यमांनी भाजप नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी यावर बोलणे टाळले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘नितीशकुमार यांनी भाजपकडून एका मंत्र्याचे नाव सुचविण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला होता. पण, पक्ष यावर भविष्यामध्ये निर्णय घेईल.’’ 

विधानसभेच्या अधिवेशनास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यादरम्यान मंत्र्यांची संख्या कमी असणे योग्य ठरले नसते, असे मोदी यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करणाऱ्या नितीश यांनी म्हटले आहे की, ‘‘उभय पक्षांमध्ये आघाडी झाली तेव्हाच कोणत्या पक्षाला किती खाती आणि जागा द्यायचे, हे आधीच ठरले होते. ‘जेडीयू’च्या रिक्त जागांचा कोटा वाढला होता. त्यामुळे आम्हाला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय घ्यावा लागला.’’ दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत गेलेले बिहारचे मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह,  दिनेशचंद्र यादव आणि पशुपती कुमार पारस यांनी राजीनामा दिला अाहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार निश्‍चित होता, असे सूत्रांनी सांगितले.

होय... नितीश भाजपवर नाराजच
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ‘जेडीयू’ला योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने नितीशकुमार हे नाराज असल्याची कबुली भाजप नेत्यांनी खासगीत बोलताना दिली. निवडणुकीतील यशानंतर भाजपने प्रादेशिक पक्षांना दिलेल्या वागणुकीवर नितीशकुमार हे नाराज आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपल्या पक्षाला महत्त्वाची खाती मिळावीत, अशी नितीश यांची इच्छा होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News