इसासनीच्या ज्योतीने हरवले गरिबीला

सुषमा सावरकर 
Saturday, 19 October 2019
  • आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहान अशाच महिलांपैकी एक. जिद्द, आत्मविश्‍वास व मेहनतीच्या बळावर तिने गरिबीसोबतच प्रतिस्पर्ध्यांवरही मात करीत परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्यांना नवी उमेद व दिशा दाखविली.

नागपूर - अनुकूल परिस्थितीत मेहनत करून यशाचे शिखर गाठणारे समाजात शेकडो सापडतील. परंतु, गरिबी व हलाखीच्या परिस्थितीतून उत्तुंग भरारी घेणे निश्‍चितच अभिनंदनास पात्र आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहान अशाच महिलांपैकी एक. जिद्द, आत्मविश्‍वास व मेहनतीच्या बळावर तिने गरिबीसोबतच प्रतिस्पर्ध्यांवरही मात करीत परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्यांना नवी उमेद व दिशा दाखविली.

युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरलेली २५ वर्षीय ज्योती इसासनीत टिनपत्र्याच्या घरात राहते.  घरात विजेचे मीटर नाही, पाण्याचा नळदेखील नाही. घरी आईवडील व तीन बहिणी. वडील मोलमजुरी करतात, तर आई मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावते. बालाजी हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेतील शिक्षकांनी ज्योतीमधील गुण हेरले. तेव्हापासूनच ज्योतीच्या जिद्दीचा प्रवास सुरू झाला. परिस्थितीसमोर तिने अजिबात हार मानली नाही. इसासनीत सरावाची सोय नसल्यामुळे तिला शहरातील नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सरावाला यावे लागले. दररोज ३२ किमीचा मॅरेथॉन प्रवास करूनही न थकता ती सतत धावायची. वेळप्रसंगी सरावासाठी तिला दुसऱ्याचे बूट उधार घ्यावे लागले. कठोर परिश्रमाचे ज्योतीला फळही मिळाले. शालेय, जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय असे एकेक टप्पे गाठत तिने थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली. 

इटली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सध्या तिरोडा येथील सी. जे. पटेल महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या ज्योतीने देशभरातील मैदाने गाजवत विविध स्पर्धांमध्ये सात सुवर्ण व आठ रौप्यपदके जिंकली. स्पर्धांमध्ये ज्योतीमध्ये असलेले टॅलेंट व जिद्द लक्षात घेता तिने भविष्यात देशाला पदक मिळवून दिल्यास आश्‍चर्य वाटू नये. ज्योतीचेही तेच स्वप्न आहे. ज्योतीच्या यशात तिची स्वत:ची मेहनत असली तरी, आईवडिलांचेही तितकेच योगदान आहे. त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटे घेत ज्योतीचे क्रीडाप्रेम जपले, प्रोत्साहन दिले. स्वत: ज्योतीलाही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. स्पर्धांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोख 

बक्षिसांमुळे आता हळूहळू ज्योतीची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आहे. शहरी व ग्रामीण भागांमध्ये अनेक युवा प्रतिभावान खेळाडू आहेत, ज्यांना खेळात करिअर करण्याची इच्छा आहे. मात्र, गरिबी व हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अशा खेळाडूंनी क्रीडा संस्थांनी मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे.
-ज्योती चौहान 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News