नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना स्थगिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 30 September 2020
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा ०१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची ऑनलाईन परीक्षा संकटात सापडली होती.
  • उद्यापासून परीक्षा असताना विद्यार्थ्यांना अद्यापही परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नव्हते.

नागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा ०१ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची ऑनलाईन परीक्षा संकटात सापडली होती. उद्यापासून परीक्षा असताना विद्यार्थ्यांना अद्यापही परीक्षेचे प्रवेशपत्र मिळालेले नव्हते. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार असण्याचा अजब आदेश काढत विद्यापीठाने आपली जबाबदारी झटकल्याने प्राचार्य फोरमने आक्रमक होत परीक्षा पुढे ढकला अन्यथा जबाबदारी स्वीकारा, असा दम विद्यापीठाला दिला होता. प्राचार्य फोरमची मागणी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अखेर विद्यापीठाने १ ऑक्टोबरपासून पुढे होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. यामुळे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेला १ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून दोन दिवसांआधी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठवण्यात आले. ओळखपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेचा युजर आयडी आणि पासवर्ड राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो परीक्षेच्या किमान एका दिवसाआधी मिळणे आवश्यक आहे. पण, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयातील कर्मचारी कामावर नाहीत. परिणामी, महाविद्यालयांकडून अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही.

कर्मचारी संपामुळे महाविद्यालयांच्या कामावर मोठा परिणाम होत असताना विद्यापीठ संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयांवर कशी टाकते, असा सवाल करीत प्राचार्य फोरमने परीक्षाच समोर ढकला, अशी मागणी केली. याशिवाय विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या ईमेलवर परीक्षापत्र पाठवण्यात आले आहेत. परंतु, ते डाऊनलोड होण्यास बराच अवधी लागत आहे. करोनाच्या संकट काळात आणि कर्मचारी संप सुरू असल्यामुळे महाविद्यालयेही हतबल आहेत. त्यातच कर्मचारी संपामुळे विद्यापीठांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

परीक्षापत्र पाठवण्यातही घोळ

विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या परीक्षापत्रांचाही घोळ झाला आहे. एका महाविद्यालयाचे परीक्षापत्र दुसऱ्याच महाविद्यालयाला गेले आहेत. नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयाचे परीक्षापत्र कोराडी येथील एका महाविद्यालयाला पाठवण्यात आले. या सर्व गोंधळामुळेही प्राचार्य फोरमने विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यापीठाकडे परीक्षेसाठी मोठी यंत्रणा असून त्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ईमेल आयडी, त्यांचे मोबाईल नंबर घेतले आहेत. असे असताना स्वत: परीक्षापत्र न पाठवता कर्मचारी संपाच्या तोंडावर ती जबाबदारी महाविद्यालयांकडे सोपवणे चुकीचे आहे. परीक्षेला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र, सर्व अडचणी लक्षात घेता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलाव्या यासाठी कुलगुरूंना निवेदन दिले.

डॉ. आर.जी. टाले सचिव, प्राचार्य फोरम.

कर्मचारी संपामुळे १ ऑक्टोबरपासूनच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षेबाबत निर्णय झाल्यावर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News