ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची देशातील चाचणी होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

भारतीय क्रीडापटूंच्या ऑलिंपिक पूर्वतयारीस हादरा बसला आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे निलंबन सहा महिन्यांनी वाढवले आहे

नवी दिल्ली:  भारतीय क्रीडापटूंच्या ऑलिंपिक पूर्वतयारीस हादरा बसला आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे निलंबन सहा महिन्यांनी वाढवले आहे, ही एकंदर प्रक्रिया पाहता ही असंलग्नता सहा महिन्यांनी वाढू शकते, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जाणाऱ्या भारतीय खेळाडूंची देशातील चाचणी होण्याची शक्‍यता धूसरच झाली आहे.

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने गतवर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा भारतातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची संलग्नता रद्द केली होती. त्या वेळी ही संलग्नता सहा महिन्यांतच मिळेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते. मात्र आता ज्या प्रकारे निलंबन लांबवले आहे, ते पाहता ही असंलग्नता किमान सहा महिने वाढू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय उत्तेजक प्रयोगशाळेतील चाचणी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही, असे जागतिक संस्थेचे मत आहे. जागतिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फेब्रुवारीत प्रयोगशाळेस भेट दिली होता. त्या वेळीही यात सुधारणा आढळली नाही. संस्थेच्या शिस्तपालन समितीने संस्थेस सहा महिन्यांनी अंसलग्नतेचा कालावधी वाढवण्याची शिफारस केली. अर्थात त्याच वेळी आपण उणिवा दूर केल्या आहेत, असे वाटल्यास अंसलग्नतेचा कालावधी संपण्यापूर्वीही भारतास अर्ज करता येईल, असेही म्हटले आहे.

आता तरी भारत आव्हान देणार?
राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची संलग्नता रद्द झाल्यामुळे उत्तेजकांचे नमुने परदेशात पाठवणे भाग पडत आहे. त्यामुळे खर्च वाढतो; तसेच निकाल येण्यासही उशीर होतो. खरे तर गतवर्षी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने कारवाई केल्यावर या निर्णयास क्रीडा मंत्रालयाने जागतिक क्रीडा लवादासमोर आव्हान देणे अपेक्षित होते, पण त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला नाही. आता एका वर्षाची अतिरिक्त टांगती तलवार असताना काय निर्णय होणा, याकडे लक्ष आहे.राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेने सहा महिन्यांच्या अतिरिक्त निलंबन कालावधीत उणिवा दूर करणे आवश्‍यक आहे. हे न केल्यास सहा महिन्यांनी कालावधी वाढू शकतो.

- नवीन अगरवाल, राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे उपसंचालक
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचा हा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा तसेच क्रीडा मंत्रालयावर परिणाम करणारा आहे. अकरा महिन्यांपासून राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेस संलग्नता नाही आणि ती आता वाढली आहे. आता याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.
- पार्थ गोस्वामी, उत्तेजकांसंदर्भातील खटले लढणारे वकील

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेचे प्रमुखपद स्वीकारण्यापूर्वी जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने नोटीस दिली होती. सहा महिन्यांच्या निलंबनानंतर मान्यता रद्द करणे लांबवण्यात आम्हाला यश आले आहे. सर्व तांत्रिक प्रश्नांकडे लक्ष दिल्यामुळेच हे घडले आहे.
- किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News