सकारात्मक विचार ही काळाची गरज - डॉ दळवी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

 आपल्या शरीरात ‘ग्रे पेशी’ असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा या पेशी सक्रिय होतात. परंतु आपण तणावाखाली, घाबरलेले असताना या पेशी कार्य करीत नाहीत. त्यामुळे आपल्या काहीही लक्षात रहात नाही. त्यामुळे सतत आनंदी, खूष राहून अभ्यास करा. सकाळ-सायंकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा करा. विद्यार्थ्यांकडून दररोज दोन वेळेला ध्यानधारणा करून घ्या, त्यामुळे नक्कीच तुमच आयुष्य बदलेल, असा सल्लाही डॉ. राहुल दळवी यांनी विद्यार्थी, शिक्षकांना यावेळी दिला.

ठाणे : गणिताची सुत्र असो, इतिहासातील सनावळी असो किंवा व्याकरण, हे सारे लक्षात ठेवण्यासाठी ते पाठांतर करण्यावर भर दिला जातो. परंतु घोकंपट्टी करणे चुकीचे आहे. त्याने त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतीलच असे नाही. एखादा विषय किंवा मुद्दा लक्षात ठेवायचा असेल तर शिक्षक विषय शिकविताना शिक्षकांकडे पूर्ण लक्ष द्या. घरी गेल्यानंतर शाळेत काय शिकविले ते आठवा. दरदिवशी असा सराव केल्यास तुमच्या मेंदूला तो सराव होऊन आपोआप शिकविलेले सर्व तुमच्या स्मरणात राहात जाईल.

सतत सकारात्मक विचार आणि ध्यानधारणा तुमचे आयुष्य बदलेल, असा सल्ला डॉ. वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक डॉ. राहूल दळवी यांनी केले. 
‘सकाळ’ च्यावतीने शनिवारी  बाळकुम येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ६० येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मनाचे ऑपरेशन’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माईंड फुलनेस थेरपीस्ट तथा वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक डॉ. राहुल दळवी यांनी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती कशी वाढवावी, याविषयी मोलाचा सल्ला दिला.

 शाळेतील ६ वी, ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. दळवी म्हणाले, शरीरातील मज्जातंतू (न्यूरॉन्स) आणि मेंदू या दोघांना चालना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. आपले विचार आपला मेंदू हस्तगत (कॅप्चर) करून त्याप्रमाणे कृती करत असतो. शाळेत शिक्षक शिकवत असताना ते लक्ष देऊन ऐका, शिक्षकांचा चेहरा, आवाज आठवून कल्पनेद्वारे ते सतत आठवा. दर दिवशी असा सराव केल्याने तुमच्या मेंदूला त्याचा सराव होऊन शिकवलेले मेंदूत कायमस्वरुपी सेव्ह होऊन जाते. परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला आपोआप शिकविलेले आठवायला लागते, असे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी शाळेतील शिक्षक सचिता पवार, प्रकाश आचारी, सविता चौधरी, ज्योती साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजसेवक महेश नागठणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. नागठणे यांनी शाळेला कपाट व प्रिंटर भेट दिला. तसेच वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ वर्तमानपत्र शाळेत उपलब्ध करून दिल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News