सकारात्मक आत्मसंवाद

प्रा. डॉ. प्रज्ञा घोरपडे
Wednesday, 7 October 2020

सध्या आपल्या आजूबाजूला घरात, कामकाजात, मनात बराच काही सुरु आहे. ' A lot is going on in life ' असं अनेकांचं झालाय. याच बरोबर अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली आहे ती म्हणजे 'अनिश्चितता '(uncertainty). खरंतर या दोन्ही गोष्टी नेहमीच आयुष्यात असतात, परंतु गेल्या सहा ते सात महिन्यांच्या कोरोनाच्या काळात याच असणं प्रकर्षाने जाणवू लागलं आहे.

सकारात्मक आत्मसंवाद

जीवन ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सध्याच्या कोरोनाकाळात जगभरात, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या दुर्दैवी घटना आपल्याला भिती, निराशेकडे घेऊन जात आहेत. याचा आपल्या शरीरावर निश्चितच परिणाम होताना दिसत आहे.  परंतु या संकटकाळातही आपण जर आपला आत्मसंवाद (सेल्फ-टॉक) सकारात्मक ठेवून स्वतःवर, जीवनावर, प्रेम करण्यास शिकणे, आनंदी जगणे हेच मोठे औषध म्हणावे लागेल.

आपल्या सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनास या कोरोनाने एक मोठा झटका दिला आहे, हे मात्र खरं! हा हा म्हणता हे संकट सगळ्या जगावरती घोंगावू लागल व त्याने संपूर्ण विश्वास ठप्प करून टाकले. लॉकडाउन झालं व सारं धावणार जग थांबलं. या काळात आपण सर्वजण हे शिकलो कि आयुष्यात संकट, आव्हाने सांगून कधी येत नाहीत. बेसावध क्षणांनी काही काळ अस्थिर व्हायला  होत खरं, पण तरी पुन्हा पाय घट रोवून उभं राहायचं व समोर येणाऱ्या परिस्थितीचा आपण सामना करायचा हे मानाशी एकदा पक्क ठरवलं की भल्याभल्या संकटांना ही आपण परतावू शकतो हा विश्वास या प्रसंगाने आपणास दिला.

कोरोना महामारीमुळे अनेक उलथ्या पालथी झाल्या. मानवी जीवनावर त्याचे मूलभूत परिणाम झाले. सध्या आपल्या आजूबाजूला घरात, कामकाजात, मनात बराच काही सुरु आहे. ' A lot is going on in life ' असं अनेकांचं झालाय. याच बरोबर अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली आहे ती म्हणजे 'अनिश्चितता '(uncertainty). खरंतर या दोन्ही गोष्टी नेहमीच आयुष्यात असतात, परंतु गेल्या सहा ते सात महिन्यांच्या कोरोनाच्या काळात याच असणं प्रकर्षाने जाणवू लागलं आहे.

हा काळ कठीण असला तरी, याचा उपयोग कसा करून घेता येईल, असा विचार ठेवला तर नक्कीच असहाय्य, अगतिक, हतबल वाटणार नाही. वास्तविक पाहता या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बंद झाले, जवळची माणसे हे जग सोडून निघून गेली, नाती कोलमडली, विरह सहन करावा लागला, एकप्रकारची अपूर्णतेची भावना व पोकळी जाणवू लागली. 

परंतु एक मात्र नक्की किंवा खरं की  बाहेर काहीही झालं तरी फुलांच्या उमलण्यात, सुगंध व सौंदर्य पसरवण्यात खंड पडत नाही तस आपल्या अनिर्धारात, नियमात व आचरणात अखंडता असेल तर आपले जीवन आनंदी झाल्या शिवाय राहणार नाही. सध्या सगळीकडून अंधारून आल्यासारखं वाटलं; तरी एक प्रकाशाचा किरण आपल्याला निश्चितच मार्ग दाखवू शकेल. असं म्हणतात ‘खुली खिडकी, खुलं मन दाखवते’, आणि बंद खिडकी मनाचे अनारोग्य दाखवते' म्हणून कधी  स्वतःला उघड ठेवायचे आणि  कधी मिटून घ्यायचं, याचं तारतम्य आपणच ठेवायला हवं नाही का ?

“कोरोनाने अक्षरशः धावणाऱ्या जगात थांबायला भाग पडलं. सारे व्यवहार ठप्प झाले. जीव वाचवण्यासाठी घरातच थांबणे क्रमप्राप्त झालं. मुखपट्टी नावाचा दागिना वापरणे आधुनिक जगाला अनिवार्य झाले. सॅनिटायझरला तीर्थचे महत्त्व प्राप्त झाले. सतत हात धुणे हा जीवनशैलीचा भाग होऊन बसला. माणसाला यासंकटाने अधिक अंतर्मुख केले. आत डोकावून पहायला भाग पाडले. कोरोनाने माणसाच्या मनाचा रंग अनेक प्रसंगातून दाखवून दिला. कोरोनासोबत जगताना आणखी हा रंग कसा उमटणार आहे हे सांगता येणार नाही. माणसाचे जगण्याचे रंग बदलत राहणार आहेत. त्याला बदल करावे लागणार आहेत. परिस्थितीमुळे मिळते जुळते घ्यावे लागणार आहे. येणारा भविष्यकाळ माणूस कसा वागेल यावर निर्भर राहणार आहे हे नक्की! पण त्याच वेळी मनात एक हिंदी गाण्याची ओळ पुन्हा पुन्हा रेंगाळते…

मन मै है विश्वास, पुरा है विश्वास,

हम होंगे कामयाब, एक दिन……..!

“कोरोना पूर्वीचं जग आणि कोरोना नंतरच जग यात प्रचंड तफावत असणार आहे. शिक्षण  क्षेत्रही याला अपवाद असणार नाही. म्हणूनच कोरोना नंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातही सर्वांना मानसिकता बदलणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन मुंबई विद्यपीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी नुकतेच केले आहे. म्हणजे कोरोना नंतर येणारी आव्हाने आपण सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पेलली पाहिजेत हे नक्की!

“कोरोना महामारीमध्ये” संकटाला न घाबरता ज्यांनी धाडसाने आणि संयमाने उभे राहून त्याचा सामना केला त्यांना त्याचा फायदा झाला. पण पण ज्यांनी घाबरून आततायीपणे चुकीचे निर्णय घेतले ते अनेक जण खूप अडचणीत आले. उदा. पोल्ट्री उद्योग, अंडी भाव, टेक्सटाइल, गारमेंट उद्योग, मास्क,पीपीई किट, रुमाल इत्यादीची मागणी सध्या खूप वाढली आहे. म्हणूनच संकटाला घाबरुन जाऊन निर्णय घेतल्यास त्यातून नुकसान अधिक होते.

‘संकटासोबत संधी ही येते’ याची जाणीव मनाशी घट्ट करून ठेवणे खूप गरजेचे आहे. या संधीची वाट पाहण्याची व संयम ठेवण्याची नितांत गरज आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे आणखी एक गोष्ट मनात घर करू लागली ती म्हणजे ‘टोकाची नकारात्मकता’. अशा परिस्थितीत नकारात्मकतेचा हा अंधार समाजमनात गडद होऊ पाहत असताना काही छोटे दीप तेवताना दिसत होते. अत्यंत ‘निगेटिव्ह’ भावना मनात दाटू पहात असताना या ‘पॉझिटीव्ह’ गोष्टी खूप दिलासा देऊन जात होत्या.

माणसातली माणुसकी, माणुसकीच नातं आणखीन गहिरं होताना पाहणे हे देखील सुखद वाटत होत. संकटाच्या काळात गहिरं होत जाणारं माणूसपण ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. साधी वाटणारी माणसं सुद्धा अशाच काळात माणुसकीचा डोंगराएवढा आदर्श उभा करतात. सामाजातील सगळ्या घटकांतील लोकांनी अशा  सकारात्मकतेतून एक आदर्श उभा केला. जीवघेण्या संकटातही सकारात्मकतेतून व चांगल्या कामातून ज्योत तेवत ठेवली.

परिस्थिती कधीच अशी आहे तशी राहत नाही ती बदलतेच. टाळेबंदीनंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी धोका अजूनही टळलेला नाही. मनातील भीती गेलेली नाही. अशा परिस्थितीत जगणे व धीराने जगणे खूप महत्वाचे आहे. मानवी समूहावर आलेले हे काही पहिले संकट नाही. या पूर्वी आलेल्या अशा अनेक संकटांवर मात करीत माणूस पुन्हा उभा राहिला आहे. हे स्मरणात ठेवून पुन्हा आशेचा, सकारात्मकतेचा दीप तेवत ठेवून सर्वांनाच कोरोनासह जगायला शिकावं लागेल.

परिस्थिती बदलेल, फक्त आज घडीला अनिश्चितता आहे इतकंच! सुख जसे कायम नसते तसे दुःखही. उलट सुखापेक्षाही दुःख अधिक शहाणे डोळस बनवून सोडते आपल्याला. प्रत्येकाला दुःखाच्या झळा पोहचतातच पण प्रत्येकाला वसंत बोलावतोय. या संदर्भात इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध रोमँटिक कवी पी. बी. शेली यांनी आपल्या एका कवितेत उद्धृत केलेल्या ओळी आठवतात

“if winter is so near, can spring be not far behind?”

इथे कवीला खात्री आहे की सुखाचे नवे युग येईल. याप्रमाणेच, जे जसे आले ते तसे त्या त्या वेळी स्विकारणे, याहून निराळे काय करायचे असते? बाकी फार अध्यात्म कळत नसले तरी जीवन खरंच खूप सुंदर आहे, हे मात्र कळते !

- प्रा. डॉ. प्रज्ञा विजय घोरपडे,

के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News