‘या’ महाविद्यालयाची दुरवस्था माजी विद्यार्थी एकवटले; सरकारने निधी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आनंद भवन या इमारतीची दुरवस्था झाली आहे.
  • इमारतीवरील छत तुटल्याने पावसाचे पाणी वर्गखोल्यांत येऊन इमारतीचे नुकसान झाले आहे.
  • या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे रखडला आहे.

मुंबई :- फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आनंद भवन या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीवरील छत तुटल्याने पावसाचे पाणी वर्गखोल्यांत येऊन इमारतीचे नुकसान झाले आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे रखडला आहे. हा निधी तातडीने मंजूर करून महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी विकास समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे.

सिद्धार्थ महाविद्यालय वाणिज्य व अर्थशास्त्र आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालय ही दोन्ही महाविद्यालये एकाच इमारतीमध्ये भरतात. ही इमारत जुनी असल्याने इमारतीची दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे; मात्र संस्थेकडे निधी नसल्याने या इमारतीची दुरवस्था झाली आहे, असे संघटनेने म्हटले आहे छतावरील पत्रे जीर्ण झाल्याने पावसाचे पाणी वर्गखोल्यांत येते. यामुळे चौथ्या मजल्यावरील वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची आसनव्यवस्थाही विस्कळित झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयाची डागडुजी करण्यासाठी बांधकाम नकाशा व खर्चाच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव समाजकल्याण सहायक आयुक्त मुंबई शहर यांच्याकडे सादर केला. हा प्रस्ताव या कार्यालयाने प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग यांच्याकडे सादर केला आहे; मात्र या कार्यालयाने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याने महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती रखडल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

गरीब विद्यार्थ्यांना फटका

इमारतीची दुरुस्ती रखडल्याने गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती पीपल्स एज्युकेशन सोसायटी विकास समितीचे पदाधिकारी ऍड. कैलास केदारे, ऍड. प्रज्ञेश सोनवणे आणि ऍड. संघराज गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असल्याने सध्या महाविद्यालयात विद्यार्थी येत नाहीत. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करून द्यावा आणि इमारतीचे काम सुरू करावे, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

...तर महाविद्यालयासमोर आंदोलन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिली. राज्य सरकारने महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला नाही, तर या महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News