खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी मिळणार ना हरकत प्रमाणपत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

आयपीएलमध्ये करारबद्ध झालेल्या आपल्या खेळाडूंना ना हरकत (नो ऑब्जेक्‍शन) प्रमाणपत्र देण्याची तयारी न्यूझीलंड क्रिकट मंडळाने दर्शवली आहे.

नवी दिल्ली: आयपीएलमध्ये करारबद्ध झालेल्या आपल्या खेळाडूंना ना हरकत (नो ऑब्जेक्‍शन) प्रमाणपत्र देण्याची तयारी न्यूझीलंड क्रिकट मंडळाने दर्शवली आहे, मात्र खेळाडूंनी स्वतःच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सुचवले आहे.

जिमी निशाम (किंग्ज इलेव्हन पंजाब), लॉकी फर्ग्युसन (कोलकता नाईट रायडर्स), मिशेल मॅक्‍लेघन आणि ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स), केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद) आणि मिशेल सॅंटनर (चेन्नई सुपर किंग्ज) हे खेळाडू यंदा आयपीएलमध्ये करारबद्ध झाले आहेत.
या सर्व खेळाडूंना आम्ही आयपीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार आहोत; मात्र त्यांनी खेळायचे की नाही किंवा स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची, हे ठरवायचे आहे, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते रिचर्ड बुक यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल दुबईत होणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे; मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याअगोदरच न्यूझीलंड मंडळाने आपल्या खेळाडूंना हिरवा कंदील दाखवला आहे.
कोरोना महामारीच्या या संकटात खेळत असताना कशी काळजी घ्यायची, याची नियमावली न्यूझीलंड मंडळ आपल्या खेळाडूंसाठी तयार करणार आहे.

न्यूझीलंड कर्णधार आणि हैदराबाद संघाचा हुकमी खेळाडू केन विल्यमसनने आयपीएल खेळण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले होते; पण आता सुरक्षेसाठी कोणते कोणते उपाय करण्यात येणार आहेत, याची माहिती घेणार असल्याचे तो सांगत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News