भारताला चिंता नाही हा खेळाडू आता तंदुरुस्त

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 3 June 2019
  • शंकर, केदारबाबत फिटनेसचा प्रश्न नसल्याचे संकेत

लंडन - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची मोहीम सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीच जखमी झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने भारतीय कर्णधाराची दुखापत गंभीर नसल्याचा निर्वाळा दिला आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. भारताचा पहिला सामना बुधवारी (ता. ५) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.

विराट कोहलीच्या अंगठ्याला क्षेत्ररक्षण करताना माफक दुखापत झाली होती. ती फारशी गंभीर नाही. त्यानंतर त्याने फलंदाजीचा सरावही केला, असे सांगण्यात आले. पण, शनिवारचा सराव संपल्यावर कोहलीने दुखावलेला उजवा अंगठा बर्फाच्या ग्लासात ठेवतच मैदान सोडले होते. 

क्षेत्ररक्षण करताना कोहलीचा अंगठा दुखावला. त्यानंतर फिझिओ पॅट्रीक फरहात यांनी कोहलीच्या दुखावलेल्या अंगठ्यावर उपचार केले. मॅजिक स्प्रेचा वापर केल्यानंतर दुखावलेल्या अंगठ्यावर पट्टीही गुंडाळली, पण ही दुखापत फारशी गंभीर नाही. या उपचारानंतर त्याने क्षेत्ररक्षणाचाच नव्हे, तर फलंदाजीचाही सराव केल्याचे समजते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याने सराव संपल्यावर जाताना आपला अंगठा बर्फाच्या ग्लासात बुडवून ठेवला होता, असेही सांगण्यात आले. कोहलीने संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत हे दाखवण्यासाठी आपला जिममधील सहकाऱ्यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला, पण त्यात त्याच्या उजव्या हातावर पट्टी दिसते. 

खरं तर भारतीय संघासमोर दुखापतीचा प्रश्‍न नसल्याचेच सांगितले जात आहे. डावा खांदा दुखावलेला केदार जाधव हाही तंदुरुस्त आहे. त्याने शनिवारी फलंदाजीचा सराव केला, तसेच गोलंदाजीही केली.त्याला कोणताही त्रास झाला नाही, असे सांगण्यात आले. जाधव दोन लढती दुखापतीमुळे खेळला नव्हता, त्यामुळे सलामीच्या लढतीत खेळवण्याबाबत फेरविचार होत आहे.

विजय शंकरच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही प्रश्‍न नाही. तो दुसऱ्या सराव लढतीच्यावेळी निवडीस उपलब्ध होता. सरावासाठी निवडलेला गोलंदाज नवदीप सैनी दुखापतीमुळे इंग्लंडलाच आलेला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News