गावाकडचा सोहळ्यातील तो फोटो आणि त्या आठवणी...

मेघना जाधव, नागठाणे
Saturday, 15 August 2020
  • काल खूप दिवसांनी हा फोटो पहिला आणि काळजाच्या एका कप्प्यात जिवंत ठेवलेल्या आठवणी पुन्हा समोर आल्या... सगळं आठवू लागलं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी जवळ येताच शाळेत सुरू होणारी तयारी  झेंडावंदन, प्रभातफेरी, भाषण, घोषणा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 'तो ' सोहळा..!

काल खूप दिवसांनी हा फोटो पहिला आणि काळजाच्या एका कप्प्यात जिवंत ठेवलेल्या आठवणी पुन्हा समोर आल्या... सगळं आठवू लागलं १५ ऑगस्ट, २६ जानेवारी जवळ येताच शाळेत सुरू होणारी तयारी  झेंडावंदन, प्रभातफेरी, भाषण, घोषणा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 'तो ' सोहळा..!

हो, सोहळाच आहे तो माझ्यासाठी, गावासाठी आणि तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी... राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या या गावात आपापसतील हेवेदावे, राग सगळं बाजूला ठेऊन विविध क्षेत्रातील व्यक्ती, सगळे गावकरी, गावातील सगळ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीत,  भक्तिमय वातावरणात संपन्न होणारा तो अवघ्या काही मिनिटांचा पण वर्षानुवर्षे मनात घर करून राहणारा तो सोहळा.

इथं कुणीच गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा नसतो सगळे देशभक्त असतात. काय असत त्या सोहळ्यात... गावाच्या सगळ्यात मध्यावर असणाऱ्या कार्यालया समोर ध्वजारोहण होत, सुरेल आवाजात राष्ट्रगीत, ध्वजगीत गायलं जात, एका आवाजात प्रतिज्ञा म्हणली जाते, शाळा महाविद्यालयातील निवडक चार भाषण होतात आणि एक देशभक्तीपर गीत गायले जात... पण हे सगळंच एक प्रकारची ऊर्जा निर्माण करणार असत. एक वेगळा उत्साह फिरत असतो त्या सोहळ्यात. माणुसकीच्या वाऱ्यासोबत आपुलकीचा सुगंध फिरत असतो सगळीकडे..! कित्येक दिवसांची मरगळ, थकवा नष्ट होऊन जातो त्या वातावरणात.

ती गर्दी फक्त गर्दी नसते तो संघ असतो देशभक्तांचा, त्या घोषणा फक्त घोषणा नसतात तो आवाज असतो एकात्मतेचा... आणि तो देखावा फक्त दिखावा नसतो देशभक्तीचा तर तो सोहळा असतो कृतज्ञतेचा..! गेल्या कित्येक वर्षांपासून या सोहळ्याची परंपरा सुरू आहे गावात. लहानपणी कळत न्हवत फक्त चांगलं वाटायचं पण हळूहळू समजू लागलं ते आवडू लागलं आणि आता तो सोहळा मी कधीच चुकवत नाही आणि आजही तो चुकवला नाही भलेही आज  तिथं नेहमीसारखी मी, गर्दी, घोषणा, भाषण काही न्हवत. पण हा सोहळा संपन्न झालाय. प्रत्येकानं घरी राहून त्या सोहळ्याचं पावित्र्य टिकवून ठेवलंय. कारण या सोहळ्याने खूप आधी पासून आमच्यात जे देशभक्तीच बीज पेरलंय, जी देशभक्तीची शिकवण दिलीये त्याच्या पुढे काही नाही आमच्यासाठी..!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News