आयआरएस सचिन मोटेंनी फिनीक्स भरारी; युवकांसाठी प्रेरणादायी

हेमंत पवार 
Saturday, 8 June 2019
  • जिद्द, चिकाटीतुन घातली आयकर आयुक्त पदाला गवसणी
  • सचिन यांनी घेतलेली फिनीक्स भरारी राज्यातील युवकांसाठी प्रेरणादायी

कऱ्हाड : कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य असुनही शिकण्याची प्रचंड उमेद असलेल्या सचिन मोटे या युवकाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाय्यक आयकर आयुक्त (आयआरएस) या पदावर मजल मारुन दारिद्र्यालाच हरवले आहे. विभुतवाडी या सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या छोट्याशा दुष्काळी वाडीमधुन येथील प्रा. बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेवुन सचिन यांनी घेतलेली फिनीक्स भरारी राज्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

विभुतवाडी या छोट्याशा दुष्काळी गावात मोटे कुटुंब राहते. त्यांच्या पाचवीलाच दुष्काळ आणि गरिबी पुजलेली. वडीलांचा मेंढपाळाचा व्यवसाय. केवळ १०० मेंढ्या हीच त्यांची संपत्ती, त्यांना शिक्षणाचा कसलाही गंध नाही. वर्षातील सहा महिने कुटुंबासह ते मेंढ्या घेवुन बाहेर असायचे. त्यामुळे शिक्षणाची आबाळ झालेली. त्यातच घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना घरखर्च भागवताना नाकीनऊ यायचे. त्यातुनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सचिन यांनी गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण पुर्ण केले.

त्याचवेळी सचिन यांना घराच्या दारिद्र्यावर शिक्षणच मात करु शकते याची जाणीव झाल्याने त्यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच दारिद्र्यालाच हरवण्याचा विडा उचलुन प्रशासनात मोठ्या पदावरील अधिकारी होण्याचे स्वप्न मनी बाळगले. त्यासाठी त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी २००४ मध्ये दहावीच्या परिक्षेत सचिन हे केंद्रात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी परिस्थीवर मात करुन शिक्षण घेण्याची उमेद असल्याने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतला.

बारावी विज्ञान शाखेत त्यांनी कऱ्हाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. गुणवत्तेच्या जोरावर त्याने प्रवेश प्रक्रीयेचा टप्पा पार पाडुन मुंबईच्या जे. जे. हॉस्पीटलला प्रवेश मिळवला. त्याचदरम्यान सचिन यांची हुशारी पाहुन लिगाडे-पाटील कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील यांनी त्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी दिवसरात्र एक करुन अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक आयकर आयुक्त या परिक्षेत यश मिळवुन दारिद्र्यालाच हरवले आहे. मेंढपाळाचा मुलगा ते आयकर आयुक्त या पदापर्यंत सचिन यांनी मारलेली मजल तरुणांसाठी प्रेरणादायीच ठरली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News