भिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

सुसंस्कृत लोकदेखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षा तत्त्वांचे पालन करीत नाहीत, मग केवळ भिकाऱ्यांनाच दोष कशाला, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला.

मुंबई: सुसंस्कृत लोकदेखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सुरक्षा तत्त्वांचे पालन करीत नाहीत, मग केवळ भिकाऱ्यांनाच दोष कशाला, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला.

रस्त्यावरील भिकारी मास्क न वापरता लोकांच्या जवळ येतात, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत आणि त्यांच्यामुळे कोव्हिड 19 चा संसर्ग वाढत आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पुण्यातील नागरिक ज्ञानेश्‍वर दारवतकर यांनी ऍड. शेखर जगताप यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये आज सुनावणी झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेक महिला, लहान मुले बेशिस्तपणे भीक मागत असतात, त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक संभवतो. तरी राज्य सरकारने यावर योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.

मात्र संपूर्ण देश कोरोनामुळे त्रस्त झाला आहे आणि कठीण प्रसंगातून जात आहे. केवळ भिकाऱ्यांना दोष कशाला द्यायचा, असा प्रश्‍न खंडपीठाने याचिकादाराला केला. शिकलेले सुसंस्कृत लोकही नियमांचे पालन करीत नाही, मग फक्त भिकाऱ्यांना दोष देणे चूक आहे, त्यामुळे संवेदनशील भूमिका घ्या, असे खडे बोल न्यायालयाने ऐकवले.

राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने याचिकेत उपस्थित मुद्द्यांवर खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News