पीसीबीला पात्रता नाही, पुढे काय?

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Monday, 3 June 2019

बारावी व नीट परीक्षा असा वेगळा अभ्यास नसतोच, आपणास बारावी पात्रता नाही याचाच अर्थ खात्रीने नीटमध्येही गुण मिळत नाहीत हे गांभीर्याने तपासा.

वैद्यकीय अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी वगैरे कोणत्याही अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेत प्रवेशासाठीची किमान गुणांची पात्रता मिळविणे आवश्‍यक असते. पात्रता मिळाली नाही, तर आपणास संबंधित शाखेत अभिमत अथवा मॅनेजमेंट कोट्यातूनही प्रवेश मिळत नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

विज्ञान शाखेतून ज्यांनी बारावीमध्ये पीसीबी विषय घेतला होता, त्यांना एमबीबीएस, बीडीएस व बीएएमएस शाखेतील प्रवेशासाठी पीसीबी विषयात एकत्रितरीत्या खुल्या गटासाठी ५० टक्के (१५० गुण) व राखीव गटासाठी ४० टक्के (१२० गुण) कमीत कमी मिळणे आवश्‍यक आहे. फार्मसीसाठी ५० टक्के व ४५ टक्के तसेच कृषीसाठीदेखील संबंधित विषयांमध्ये ५० टक्के व ४० टक्के गुणांची अट असल्यामुळे ज्यांना या गुणांची पात्रता मिळाली नाही, त्यांच्यासाठी फार्मसी शाखा तसेच कृषी शाखेसाठीही प्रवेश घेता येत नाहीत.

स्वतःची बौद्धिक क्षमता स्वीकारा : माझ्या मुलाला फक्त एमबीबीएसच करायचे आहे, त्याचे तेच अंतिम ध्येय आहे. तो अत्यंत हुशार आहे. त्याने फक्त नीटकडेच लक्ष दिले, त्याने बोर्ड अभ्यासाकडे लक्षच दिले नाही, खासगी क्‍लासमध्ये बोर्ड अभ्यास घेतलाच नाही, त्यामुळे पात्रता मिळाली नाही, असाच सगळा सूर विद्यार्थ्यांचाच नव्हे तर पालकांचाही येताना दिसतो. विद्यार्थी, पालकांनी आपला निकाल प्रथम स्वीकारावा.

बारावी व नीट परीक्षा असा वेगळा अभ्यास नसतोच, आपणास बारावी पात्रता नाही याचाच अर्थ खात्रीने नीटमध्येही गुण मिळत नाहीत हे गांभीर्याने तपासा. पात्रता नाही, परंतु नीटमध्ये ४००-५०० गुण मिळत आहेत, असे उदाहरण कोठे सापडते का ते पाहा. कोणत्याही अभ्यासक्रमासाठी कमीत कमी पात्रता मिळालेली नाही याचाच अर्थ संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडे बौद्धिक क्षमता नाही हे प्रथम विद्यार्थी, पालकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे.
 

पर्याय १ : आपणास आरोग्य विज्ञान शाखेची आवड आहे, मग एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस वगळता उर्वरित बीएचएमएस- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बीपीटीएच - बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बीओटीएच- बॅचलर ऑफ ॲक्‍युपेशनल थेरपी, बीएएसएलपी - बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी ॲण्ड स्पीच लॅंग्वेज थेरपी, बीपी ॲण्ड ओ- बॅचलर इन प्रोस्थेटिक्‍स ॲण्ड आर्थ्रोटिस असे पाच अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व अभ्यासक्रमांतून तुम्ही निश्‍चितच स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. यापैकी बीएएसएलपी व बीपी ॲण्ड ओ यांच्या शासकीय जागा फक्त अनुक्रमे २५ व १५ आहेत. मात्र अभिमत विद्यापीठामध्ये काही ठिकाणी सदर कोर्सेस उपलब्ध आहेत. बीपीटीएचच्या मात्र शासकीय व खासगी अशा सुमारे १५८० जागा उपलब्ध होतात. राज्यात बीएएमएसचे एकही शासकीय महाविद्यालय नाही, परंतु ५३ खासगी महाविद्यालयांतून ४१०० जागा उपलब्ध होतात. राज्यातील संस्थांचे सरासरी शुल्क ७० हजार रुपयांपर्यंत आहे. या सर्व संस्थांमध्ये शासकीय नियमानुसार आरक्षण आहे. तसेच शासकीय प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश मिळाल्यानंतर नियमानुसार शुल्कमाफीसुद्धा मिळते. ज्यांना पीसीबीमध्ये पात्रता मिळाली नाही, त्यांच्यासाठी हे सर्व पर्याय, त्यातही बीएचएमएस हा अतिशय योग्य पर्याय आहे.
 

पर्याय २ : ज्यांना पात्रता गुण मिळाले नाहीत, ज्यांची अतिशय थोड्या गुणांनी गेली, त्यांच्यासाठी फेरतपासणीचा पर्याय बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पर्याय ३ : पात्रता मिळाली नाही अशा वेळी नीटमध्ये कधीही ४०० च्या पुढे गुण शक्‍यतो मिळतच नाहीत. सर्वसाधारणपणे २०० ते २५० गुण मात्र मिळू शकतात. म्हणजेच एमबीबीएससाठीची बौद्धिक क्षमता नाही असेच समजावे. तरीही जे विद्यार्थी, पालक ही गोष्ट स्वीकारायला तयार नाहीत, त्यांनी मात्र जरी बारावी परीक्षा पास झाले, तरीही पुन्हा दुसऱ्यांदा श्रेणी सुधार योजनेंतर्गत बारावी परीक्षा देऊन पात्रता प्राप्त करण्याचा मार्ग उपलब्ध असतो, परंतु त्यासाठी एक वर्षे कालावधी वाया जातो.

पीसीबीमध्ये बारावीची पात्रता नसताना म्हणजेच आपली बौद्धिक क्षमता नसतानाही केवळ लोक काय म्हणतील असा विचार करून एमबीबीएसचा अट्टहास पालकांनी करणे योग्य आहे का? याचे चिंतन करावे. आपल्या पाल्याला खरंच एमबीबीएस शिक्षण पूर्ण करता येईल का आणि फक्त एमबीबीएस शिक्षण घेऊन उपयोग नसून त्यानंतर एमडी-एमएस अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश प्राप्त करता येईल का याचे जरूर चिंतन करावे व आपण योग्य तो मार्ग निवडावा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News