संघाला गरीब, दलित, वंचित यांच्याविषयी अजिबात आस्था नाही : पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • संघाडून चिकाटी आपणही शिकली पाहिजे,’’ असा सल्ला
  • ‘‘भाजप सरकारला गरीब, दलित, वंचित यांच्याविषयी अजिबात आस्था नाही​

पुणे - ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जोपर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत; पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी आपणही शिकली पाहिजे,’’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपला मिळणाऱ्या यशामागील गुपित एका भाजप खासदारानेच सांगितल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

भोसरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपला देश सर्वसमावेशक आहे. तरीही धर्माच्या नावावर मते मागितली जातात. देशाची निवडणूक सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवी वस्त्रे घालून दिवसभर गुहेत बसतात; जग कुठे निघालेय, विज्ञान काय सांगते आणि तुम्ही नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवताय. देशात ही कसली प्रवृत्ती वाढली आहे.’’ 

शरद पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकारला गरीब, दलित, वंचित यांच्याविषयी अजिबात आस्था नाही. राज्यांमधील नेमके प्रश्‍न माहीत नाहीत. महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ आहे. त्यात राजकारण आणू नका. जनावरांना जगवा. माणसांबरोबरच जनावरांसाठीही पाण्याचे टॅंकर पुरवा. उद्या याबाबत सरकारबरोबर दुसरी बैठक होत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने, मोठे औद्योगिक कारखाने, कंपन्या यांनी आपला वाटा म्हणून टॅंकर आणि चारा छावणीची जबाबदारी घ्यावी.’’

मोदींच्या शपथविधी सोहळ्यावेळी आसन पाचव्याच रांगेत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास मला पाचव्या रांगेतीलच आसन राखीव ठेवले होते, याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला. ते म्हणाले, सोहळ्याच्या अगोदर आसन कोठे आहे, याची माहिती घेण्यासाठी माझा सचिव संबंधित खात्यात गेला होता. त्या वेळी आसन पाचव्या रांगेतीलच असल्याचे सांगितले गेले. याबाबत पुन्हा खात्री करण्यासाठी तो दोन वेळा गेला होता. 

त्या वेळीही त्याला तशीच माहिती देण्यात आली होती. आता सरकारी अधिकारी म्हणत असतील की पहिल्या रांगेतच आसन होते. रोमन लिपीत पाच आकडा असल्याने गोंधळ झाला वगैरे, त्यात आता फारसे तथ्य राहिलेले नाही.’’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News