पक्षाला आता पवारच तारतील

अविनाश म्हाकवेकर 
Friday, 7 June 2019
  • कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचे काम

पुणे - लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस खचली आहे. त्यामुळे उमेद हरू नये, यासाठी दुष्काळाच्या निमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर फिरत आहेत. गावोगावच्या बैठकांमध्ये शेती, पाणी, चारा, छावणी या प्रश्‍नांच्या जोडीलाच ते कार्यकर्त्यांशी बोलत आहेत.

पिंपरी-चिंचवड दौऱ्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र नव्या चेहऱ्यांना संधी देत आहोत, असे सांगितले. त्यामुळे पक्ष पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. 

अडचणीच्या काळात पुणे, पिंपरीतील प्रमुख नेत्यांपाठोपाठ कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीत पिंपरी आणि चिंचवड अशा दोन्ही जागा गेल्या. पंधरा वर्षे ताब्यात असलेली महापालिका गेली. त्यात आता पार्थ पवार यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. ‘होम पीच’वरील या अपयशाचा हादरा राज्यपातळीवर बसला आहे.

तो किती जोरदार होता, याची प्रचिती पवारांच्या बैठकीच्या निमित्ताने आली. बैठक कार्यकर्त्यांसाठी असली, तरी छोटासा हॉल खचाखच भरला नव्हता. पवारांच्या आजूबाजूला बसलेल्यांचे चेहरे पडलेले होते. याशिवाय जे उपस्थित होते ते पवारांच्या आदरापोटी आले होते, हे विशेष जाणवले.

भाषणात पवारांनी विधानसभा निवडणुकीवर अधिक भर दिला. ‘कार्यकर्त्यांनो, खचू नका. आपण सर्वत्र नवे व तरुण चेहरे रिंगणात उतरविणार आहोत. तुम्हाला संधी मिळेल,’ असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. तसेच, कार्यकर्त्यांनी काम कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करताना एका संघ स्वयंसेवकाने दिलेल्या माहितीचे दोन ओळींचे उदाहरण दिले.

संदर्भ म्हणून भाषणाच्या ओघात ते बोलले. मात्र, संघाचे त्यांनी किती कौतुक केले? का करावे वाटले? याविषयीच्याच अधिक चर्चा माध्यमांतून रंगल्या. यामुळे बैठकीचा मूळ उद्देश किंवा नव्या कार्यकर्त्यांना दिला गेलेला संदेश हरविला. मात्र, या भाषणातून पक्ष प्रचाराबाबतीत गंभीर झाला आहे, हे दिसले. त्यामुळे येथून पुढे नवा उमेदवार आणि घर ते घर प्रचारावर भर राहील.

तिसरा मुद्दा सत्ताकाळात केलेल्या कामाचे मार्केटिंग करण्याचा होता. आपण काम करीत राहिलो. आजवर केलेले काम लोकांवर सतत, विशेषत: निवडणूक काळात बिंबविण्यात कमी पडल्याची जाणीव पक्षाला झाली आहे. त्यामुळे आता येथून पुढे राज्यात आपल्या सत्ताकाळात कोणकोणती कामे केली आणि या सरकारने काय केले, यावर भर राहील, असे दिसले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News