पार्थ खणखणीत नाणं, पण खिश्यातलं...?

गोविंद अ. वाकडे
Tuesday, 26 February 2019

अनेक राजकीय घराण्यांनी वेगवेगळ्या मतदार संघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे, मात्र बदलत्या राजकारणानुसार त्यांची ही पुण्याई त्यांना तारूण नेणार नाही, आधीच्या पिढीच्या कर्तृत्वाचा प्रारंभिक लाभ मिळेल पण स्वतःला सिद्ध केलं नाही, तर लोक दुसरी संधी देणार नाहीत. वाड- वडिलांच्या पुण्याईवर पिढीजात सत्ता उपभोगण्याचा कालखंड संपुष्टात येत चालला आहे.

पार्थ अजित पवार.राज्याच्या राजकारणात मागच्या दाराने, पण घराणेशाहीच्या रेड कार्पेट वरून थेट घुसलेला आणखी एक घुसखोर चेहरा, पवारांच्या कर्तृत्ववान घराण्यात वाढलेल्या हा तरुण, घरातील ज्येष्ठांनी राजकारणात सक्रिय होण्याआधी खाल्लेल्या खस्ता विसरून थेट दिल्ली दरबारी विराजमान होऊ पाहतोय, तसं पवारांचं राजकीय साम्राज्य आणि देशाच्या राजकारणातील दबदबा बघता त्यांच्या तिसऱ्या पिढीनं अस स्वप्न बघणं काही गैर नाही आणि त्याला कुणाची हरकत असायचही काही कारण नाही पण प्रश्न हा आहे की केवळ बापजाद्यांच्या कर्तृत्वाचे दाखले देत एखादं नवख, अनुभवशून्य नेतृत्वं लादल जात असेल तर ते मतदारांनी का म्हणून स्वीकारायचं..?

मागील 3- 4 महिन्यापासून पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात वाऱ्याच्या वेगाने ज्या भेटी गाठी घेत नेत्यांबरोबर मतदारांशीही जुळवून घेण्यासाठी जो आटापिटा करतोय ते बघून त्याची राजकारणात सक्रिय होऊन थेट नेता होण्याची मनीषा कुणापासूनही लपून राहिलेली नाही, मात्र शरद पवार ह्यांचा नातू आणि अजित पवार ह्यांचा पुत्र असल्याने (म्हणजे केवळ ह्या दोनच कारणांमुळे) पिंपरी ते पनवेल मधल्या राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी (कार्यकर्ते सोडून) पार्थसमोर पायघड्या अंथरल्या आहेत, त्या नेत्या पदाधिका-यांसाठी कदाचीत ही पक्षनिष्ठा असेलही मात्र विश्लेषक, जाणकार आणि खासगीत बोलणारे राष्ट्रवादीतलेच अनेक इच्छुक नेते पार्थ म्हणजे आमची अपरिहार्यता आणि हतबलता असल्याचं बोलतात आणि इथेच शरद पवारांच्या विचारांची माती होते. कारण जगभारतील लोकशाही देशातील सर्व नितींचा अभ्यास करून ह्या नेत्याने आपल्या पक्षात लोकशाही रुजवली, पक्ष वाढवला आणि तो पक्षीय लोकशाहीचा अधिकार न वापरताच पार्थ- समर्थक नेते सरळ नतमस्तक झाले आणि म्हणूनच पार्थ नवखा आहे त्याची खासदारकीच्या मैदानात टिकण्याची क्षमता नाही हे सांगायला कुणी धजावत नाही अर्थातच पार्थला असा विरोध करून सगळ्याच पवारांशी पंगा कोण घेणार ही त्यामागची भीती आहे.

मात्र पार्थचं राजकीय कोवळेपण ओळखून खुद्द शरद पवारांनीच पार्थ निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं, तेव्हा मात्र त्यांच्याच पक्षातल्या (अजित पवार समर्थक) नेत्यांनी पुन्हा पार्थच हवा अशी मागणी करत पवारांना साकडं घालायला सुरवात केलीय, त्यामुळे पार्थ निवडणूक रिंगणात असावा ही नेत्यांची नाही तर एका मुत्सद्दी आणि हळव्या बापाची इच्छा आहे हे स्पष्ट आहे. अजित पवारांना आपला मुलगा पार्थ राजकारणात सक्रिय करण्यामागची दोन कारण आहेत, एक म्हणजे त्यांना राज्याच्या राजकारणाचं नेतृत्व करायचंय आणि दुसरं कारण म्हणजे अजित पवार आत्ता निवडणुकीच्या मैदानात उतरले तर ऐन निवडणुकीत त्यांच्यावरील सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांच्यासह पक्षाची कोंडी केली जाऊ शकते, ह्या कारणांमुळे संधी असून देखील अजित पवार निवडणूक लढवत नाहीत हे जवळपास निश्चित मानलं जातय. मग अश्यावेळी  म्हणजे अक्षरशः रक्त जाळून बांधणी केलेल्या मतदार संघात कोण उभा करायच तर पार्थ शिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणलं असावं. 

असो,शेवटी बापाचं मन आहे, पण... केवळ अजित पवारांना वाटते म्हणून किंवा पार्थ, शरद पवारांचे नातू आहेत म्हणून किंवा युती झाली असली तरीही सेनेचे निश्चित मानले जाणारे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे ह्यांचा पराभव करण्यासाठी आतुर असलेल्या भाजपवाल्यांची पार्थला छुपी मदत मिळेल आणि पार्थ निवडणूक जिंकेल अस कुणाला वाटतं असेल म्हणून, काय मतदार मेंढरं बनतील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीय. दुसरीकडे पार्थचा एकूणच वावर, त्याची देहबोली आणि डळमळीत आत्मविश्वास हा कुणालाही न पसंत पडलेल्या बाबी आहेत.
 
मात्र ह्यातही पार्थसाठी काही जमेच्या बाजू आहेत आणि त्या म्हणजे पार्थ तरुण आहे. त्याला तरुणांच्या प्रश्नाबरोबरच कर्तृत्वही आणि त्यांच्यातील कौशल्य लवकर कळतं, तो उच्च शिक्षितही आहे, आणि निष्कलंक आहे. असं नाणं खणखणीतच वाजतं ह्यात शंका नाही. मात्र सध्या तरी हे नाणं दुसऱ्याच्या खिशात आहे. आणि तसे संकेत पार्थ स्वतःच देतो अन्यथा मागच्या 4 महिन्यात राष्ट्रवादीने घेतेलेल्या एका तरी आंदोलनात किमान परिवर्तन निर्धार सभेच्या व्यासपीठावर तरी तो दिसला असता पण ना तो अश्या ठिकाणी उपस्थित असतो ना त्याला घेऊन फिरणारे अश्या ठिकाणी घेऊन येतात. 

तसं म्हणायला गेलं तर निवडणुकांना बराच अवधी आहे, उरलेल्या वेळात कदाचित पार्थ स्वताला सिद्ध करेल (मात्र आता त्यासाठी त्याला साम, दाम, दंड, भेद वापरूनच हे अंतर पार करता येणार आहे) पण म्हणून काय आता खुशाल बार चे उदघाटन करत फिरावं आणि जनआंदोलनाकडे पाठ फिरवावी असही नाही. 

पार्थसाठी मैदान तयार केलं गेलय हे खरं आहे, पण त्यात तो कुणाच्या खांद्यावर बसून लढाई लढणार असले तर ते जमणार नाही. पार्थ ला स्वतः तावून सुलाखून निघावं लागेल, 18 -18 तास काम करणारे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे किमान ह्यांचा आदर्श आमलात आणायचा म्हणून तरी रस्त्यावर उतरावं लागेल. असा पार्थ उमेदवार, लोकप्रतिनिधी, नेता म्हणून केवळ स्वीकारलाच नाही तर डोक्यावर घेतला जाईल... 

अन्यथा, घराणेशाहीची झुल पांघरून पार्थ मैदानात उतरणार असेल तर त्याने खुशाल उतरावं मात्र ती झुल त्याच्या डोळ्यावरची झापडही बनेल ज्यामुळे त्याला दुःखीत, शोषित, पीडितांच्या यातना दिसणार नाहीत. त्यामुळे तो नेतृत्व तर करू शकेल मात्र त्याच्यात  कर्तृत्ववान, धुरंदर, मुत्सद्दी, अभ्यासू लोकनेता किंवा जाणता राजा होण्याइतपत नैतिकता जरूर नसेल. आणि शरद पवारांनीच ह्या बाबत लोक माझे सांगती" ह्या त्यांच्या राजकीय आत्मकथनाच्या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात लिहून ठेवलय. पवार म्हणतात, "अनेक राजकीय घराण्यांनी वेगवेगळ्या मतदार संघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे, मात्र बदलत्या राजकारणानुसार त्यांची ही पुण्याई त्यांना तारूण नेणार नाही, आधीच्या पिढीच्या कर्तृत्वाचा प्रारंभिक लाभ मिळेल पण स्वतःला सिद्ध केलं नाही, तर लोक दुसरी संधी देणार नाहीत. वाड- वडिलांच्या पुण्याईवर पिढीजात सत्ता उपभोगण्याचा कालखंड संपुष्टात येत चालला आहे "
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News