मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी सतर्क असणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020

शिक्षण आता प्रगत होत चालले आहे. त्यामुळे स्पर्धाही वाढल्या आहेत. शाळेचा पालक शिक्षक संघाने केवळ कार्यक्रमापुरताच मर्यादित न राहता मुलांच्या जडणघडणीसाठी योगदान दिले पाहिजे.

वाळपई : शिक्षण आता प्रगत होत चालले आहे. त्यामुळे स्पर्धाही वाढल्या आहेत. शाळेचा पालक शिक्षक संघाने केवळ कार्यक्रमापुरताच मर्यादित न राहता मुलांच्या जडणघडणीसाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी संघटनेच्या सदस्यांचे प्रबोधन आवश्यक आहे. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी सदोदित कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण विचारक नारायण देसाई यांनी केले.

वाळपई - वेळूस येथील श्री हनुमान माध्यमिक शाळेच्या पालक शिक्षक संघातर्फे आयोजित पालक प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सत्तरी तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या सर्व कार्यकारी समितीतील सदस्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हनुमान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनल काणेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष 
वामन बापट, कार्यक्रम प्रमुख राजाराम सांडये, संजय तेंडुलकर यांची उपस्थिती होती. 

नारायण देसाई यांनी पालकांची जबाबदारी, कर्तव्य, हक्क याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शाळेतील साधनसुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. पालकांनी शैक्षणिक कायदे, नियम समजून घेतले पाहिजे व सामंजस्यांनी त्यावर तोडगा काढला पाहिजे. पालकांनी शिक्षकांना विश्वास दाखवावा व चुकीच्या गोष्टींचे समर्थन मुलांविषयी करू नये. कारण शिक्षक हा कायद्याला घाबरून मुलांना चुकीच्या गोष्टीचा जाब विचारत नाही. अशावेळी पालकांनी मुलांना खडसावले पाहिजे. मुलांचा टक्केवारीवर गौरव केला जातो. त्याचबरोबर शंभर टक्के हजेरी, सेवाव्रत यासाठीही गौरव करावा. राजाराम सांडये, वामन बापट यांनी पालक संघटनेच्या उपक्रमांची माहीती दिली. वक्त्यांचा परिचय ॲड. सौ. हर्षदा हळदणकर, तर ऐश्वर्या फडके व मंजिता गावकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. संजय तेंडुलकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात सत्तरीतील वीस शाळांच्या ९० पालक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. नारायण देसाई यांना यावेळी भेटवस्तू प्रदान करण्यात आली. मीनल काणेकर यांनीही विचार व्यक्त केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News