पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! नाही तर..? 

परशुराम कोकणे 
Wednesday, 22 May 2019

सुटीत तलाव, विहिरी, रेल्वे रुळाजवळ मुलांची धोकादायक भटकंती 

सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव तसेच शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या परिसरात दोन- चार मुले खेळत असल्याचे आपण रोजच पाहतो. कधी शक्‍य झाल्यास आपण या मुलांना हटकतो आणि जावा घराकडे... असे म्हणून पुढे निघून जातो. पालकांचे दुर्लक्ष, मित्रांची संगत यामुळे घराबाहेर पडलेल्या मुलांसोबत वाईट घटना घडल्याचे दिसून येते. रविवारी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर तलाव परिसरात अशीच दुर्घटना घडल्याने, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

तलाव, विहिरी, रेल्वे रुळाच्या परिसरात मुलांचा रोजच वावर असतो. सुट्यांच्या कालावधीत तर अनेक मुले पालकांना न सांगता सकाळी घराबाहेर पडून सायंकाळ झाल्यावर घरी जातात. वाईट संगतीमुळे मुले वाममार्गाला लागतात, कधी दुर्घटना होते. सुटी असल्याने फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या निखिल लक्ष्मण उगाडे (वय 17), सौरभ ज्ञानेश्‍वर सरवदे (वय 16, दोघे रा. रविवार पेठ, सोलापूर) या दोघांसोबत असाच प्रकार घडला. दोघांचा रविवारी सिद्धेश्‍वर तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांनाही पोहायला येत नव्हते. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वडिलांचे निधन झाल्याने निखिल हा काम करून आईला मदत करायचा. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सुट्या असल्या किंवा नसल्या तरी पालकांनी मुलांना कोणत्या तरी विषयात गुंतवून ठेवले पाहिजे. विरंगुळा म्हणून मुले मित्रांसोबत बाहेर जाणार असतील तर कोठे आणि कोणासोबत जात आहेत याची चौकशी करावी. पालकांचा मुलांशी संवाद आणि मित्रांची संगत महत्त्वाची आहे. 

- मंजूषा माने, 
मुख्याध्यापिका, सहस्त्रार्जुन विद्यामंदिर 

सुटीच्या कालावधीत पालकांनी मुलांना संगणक प्रशिक्षण किंवा अन्य प्रशिक्षण दिले पाहिजे. अनेक कुटुंबात आई- वडील सकाळी कामावर गेल्यानंतर मुले घरी एकटेच असतात. मित्रांच्या संगतीमुळे मुलांकडून चूक होऊ शकते. पालकांना न सांगता मुलांनी बाहेर जाऊ नये. 

- रुपेश भोसले, 
सामाजिक कार्यकर्ते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News